करमाळा (सोलापूर) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये करमाळा शहर व तालुक्याने सहभागी होण्याचे आवाहन केले असून बुधवारी (ता. 14) करमाळा बंद राहणार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय येथे निवेदनही दिले जाणार आहे, अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
मराठा आरक्षणाची अंमल बजावणीसाठी जरांगे यांनी मुंबईत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तेव्हा मराठा समाजाची पायी दिंडी वाशी येथे अडवण्यात आली होती. तेव्हा सगेसोयरेचा अध्यादेश काढत आरक्षण देण्याचे जाहीर केले होते. मात्र त्याची प्रत्येक्षात अमलबजावणी झाली नाही. त्यावर हरकती घेण्यात मागवण्यात आल्या होत्या. मात्र अध्याध्येश पारित होईपर्यंत त्याची अमलबजावणी करण्याची मागणी करण्यात येत असून त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी जरांगे यांची आहे. त्याला पाठींबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे. त्यालाच अनुसरून करमाळा शहर व तालुका बंद ठेवण्यात येणार आहे, असे सकल मराठा समाज करमाळा शहर व तालुकाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.