करमाळा (अशोक मुरूमकर) : राजकरणात कधी काय होईल हे कोण सांगू शकत नाही. याची अनेक उदाहरणे आहेत. विधासनभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले काँगेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप हे राज्यात सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले. त्यानंतर काही दिवसातच दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादीचे गट झाले. या घडामोडींना चार वर्ष होत असतानाच करमाळा बाजार समितीच्या माध्यमातून जगताप, पाटील, बागल यांचा समझोता झाला आणि हा समझोता होत असतानाच शिंदे गटाने जगताप यांना पाठींबा दिला. जसा राज्यात सत्तेसाठी प्रयोग झाला तसाच काहीअंशी करमाळ्यातही प्रयोग झाला. तसा करमाळ्यातील प्रयोग योग्यच आहे त्याला अनेक करणे आहेत.
करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीत जगताप गटासह शिंदे, बागल व पाटील गटाने अर्ज दाखल केले. अर्ज मागे घेण्यासाठी मुदत असतानाच मोहिते पाटील यांच्या माध्यमातून एकमेकांचे कट्टर असलेले पाटील, बागल व जगताप यांच्यात समझोता झाला. हा समझोता फक्त बाजार समितीसाठी असला तरी याचे परिणाम पुढील राजकारणावर दिसणार आहेत हे निश्चित! हे सगळं घडवून आणणारा अजून समोर आला नसला तरी त्यांचे कौतुक करणे आवश्यक आहे.
राजकारणात संख्याबळाला महत्व असते. आणि तसे वातावरण निर्माण व्हावे लागते. गेल्या निवडणुकीत जगताप गटाच्या हातून बाजार समिती निसटली होती ती पुन्हा काहीही करून आणायचीच याची तयारी त्यांनी पूर्वीपासूनच केली होती. बागल गट सत्तेत होता, मात्र तरीही त्यांनी साधे व्यापारी गटात मतदानही वाढवले नाही. जगताप गटाने आपला सोसायटी मतदारसंघावरचे वर्चस्व कायम रहावे म्हणून सोसायटीच्या निवडणुका सुरु असतानाच लक्ष घातले आणि योग्य त्यांनाच आणि विश्वासूना संधी दिली. तेव्हा बागल आणि पाटील यांनीही पाहिजे तसे लक्ष दिले नव्हते.
या निवडणुकीत शिंदे गटाने सुरुवातीलाच जगताप गटाला पाठींबा दिला होता. मात्र त्यांच्या गटात निवडणूक व्हावा, असा प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त एका माध्यमात आले होते. त्यामुळे या बाजार समितीला विशेष महत्व आले होते. ऐनवेळी यात काही दगाफटका होईल का? अशी शक्यता खासगीत कार्यकर्ते बोलत होते. त्याची चाचपणीही सुरु होते. मात्र शिंदे गटाचे सुजित बागल, चंद्रकांत सरडे हे सुरुवातीपासून आम्ही जगताप आणि मामा जे सांगतील तोच निर्णय घेणार असे सांगत होते.
अर्ज दाखल करायला सुरुवात झाल्यापासून या निवडणुकीत जगताप गटाला वातावरण चांगले आहे असे चित्र होते. ग्रामपंचायतमध्ये मात्र जगताप आणि शिंदे एकत्र लढूननही फायदा होणार नाही अशी चर्चा होती. बागल आणि पाटील हे एकत्र लढले असते तर थोडेफार चित्र वेगळे होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र काही दगाफटका बसला असता तर मात्र या निवडणुकीत चित्र वेगळे दिसले असते, असा काही जाणकारांचा अंदाज होता. मात्र फक्त विरोधाला विरोध करायचा नाही, लोकभावना विचारात घेतली पाहिजे त्यातून ही बाजार समिती बिनविरोध व्हावी, अशी भावना सर्वसामान्य नागिरीकांची होती. त्याचा पुरावा म्हणजे ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने घेलेला सर्व्हे. या सर्व्हेमध्ये २४ तासात ५६ टक्के लोकांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी याबाजूने मतदान केले होते. ही निवडणूक अजूनही बिनविरोध झालेली नाही भाजप आणि सावंत गट काय निर्णय घेत आहे हे पहावे लागणार आहे. २६ तारखेला कोण अर्ज मागे घेणार आहे पहावे लागणार आहे.
बागल, पाटील व जगताप यांच्या समझोत्यामुळे यांच्यात गेल्या बाजार समितीमुळे जी कटुता निर्माण झाली होती ती काही अंशी कमी होणार आहे. याचे चित्रही काल कांदरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात दिसून आले. दिग्विजय बागल आणि माजी आमदार नारायण पाटील हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला एकत्र आले होते. तेव्हा त्यांची देहबोली सर्व काही सांगून जात होती. या तिन्ही गटाचा झालेला समझोता योग्यच असल्याचे काहींचे मत आहे तर काहींचे हे योग्य नसल्याचेही मत आहे.