करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अकलूज येथे भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. करमाळा तालुक्याच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या तिन्ही गटाच्या प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. जगताप गटाचे प्रमुख माजी आमदार जयवंतराव जगताप, पाटील गटाचे प्रमुख माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांच्यासह नवनाथ झोळ, अजित तळेकर, देवानंद बागल, कल्याण सरडे, भारत पाटील यावेळी उपस्थित होते.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. करमाळा तालुक्यातील नागरिकांच्या मनातही ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच भावना होती. ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने या निवडणुकीबाबत घेतलेल्या सर्व्हेमध्ये ५६.७ टक्के नागिकांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे मत व्यक्त केले होते. या निवडणुकीत आमदार शिंदे गटाने जगताप गटाला पाठींबा दिला होता. शिंदे गटाच्या उमेदवारांनी अर्जही मागे घेतले होते. पाटील आणि बागल हे काय करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता त्यांच्यातही बैठक झाली आहे.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी काल (गुरुवारी) अकलूज येथे जाऊन आमदार मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (शुक्रवारी) मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत माजी आमदार जगताप, माजी आमदार पाटील व बागल या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत बागल व पाटील गटासाठी प्रत्येकी दोन- दोन ग्रामपंचायत मतदारसंघांतील जागा देण्याचा निर्णय झाला. उर्वरित सोसायटी मतदारसंघातील 11 जागा जगताप गटाला देण्याचा निर्णय झाला.