करमाळा (सोलापूर) : करमाळ्याचा झेंडा थेट अमेरिकेत तिसऱ्यांदा फडकला आहे. देवळाली येथील संगणक अभियंता तेजस वीर याने सॅन अँटोनियो, टेक्सास, अमेरिका येथे नुकत्याच झालेल्या मेन्स जागतिक ओपन रॅकेटबॉल चॅम्पियनशिप (World Championship) स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल (silver medal) पटकाविले. यापूर्वी 2022 व 2023 मध्येही ब्रॉंझ मेडल मिळविले होते.
या स्पर्धेमध्ये १२ देशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. तेजस यांनी या खेळाचे प्रशिक्षण अमेरिकेत घेतलेले आहे परंतु स्पर्धेत उतरताना भारतीय संघातून सहभाग घेत आहे. तेजस हे पाच वर्षापासून या खेळात आहे. तेजस वीर हे सध्या शिकागो, अमेरिका येथे नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. तेजस वीर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण प्रियदर्शनी इंग्लिश स्कूल, धनकवडी तर संगणक अभियंता ही पदवी व्हीआयटी कॉलेज पुणे येथून घेतलेली आहे. तसेच संगणक क्षेत्रातील एमएस ही उच्च पदवी अमेरिकेत घेतलेली आहे.
तेजस हे पुणे येथील श्री शिवाजी मराठा हायस्कूलमधील सुंदरदास वीर यांचे चिरंजीव आहेत. तेजस यांचे सिल्वर मेडल जिंकल्याबद्दल देवळाली ग्रामस्थांनी व करमाळकरांनी आनंद व्यक्त केला आहे. तेजस यांचे सर्वच स्थरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.