करमाळा (सोलापूर) : ग्रामीण भागात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात अनेकदा तक्रारी देऊनही प्रभावी कारवाई केली जात नसल्याने करमाळा मेडिकोज गिल्ड या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
ग्रामीण भागात बोगस वैद्यकीय व्यवसाय कोणतीही प्रमाणित वैद्यकीय पात्रता नसताना हे बोगस डॉक्टर सामान्य गोरगरीब रुग्णांवर चुकीच्या पध्दतीने उपचार करतात. यामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता असते. याबाबत अनेकदा तक्रारी करुनही त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून होत नाही. त्यामुळे करमाळा तालुक्यातील वैद्यकीय व्यावसायिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली होती. हीबाब अत्यंत गंभीर असल्याने करमाळा तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन समितीमार्फत त्यांच्याकडील तपासणी करून दोषी आढळलेल्या बोगस डॉक्टर व संबंधित अधिकारी यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
करमाळा शहर त्याचबरोबर केतुर चिखलठाण वडशिवणे केम उमरड ईत्यादी गावांमध्ये बोगस डॉक्टर राजरोसपणे अनेकदा चुकीचे उपचार देत आहेत ही वस्तुस्थिती नजरेला आणून ही शासकीय पातळीवर यावर कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही
- डॉ. अमोल घाडगे, अध्यक्ष, करमाळा मेडिकोज गिल्ड