करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील एका गावामधील १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे कशाची तरी पूस लावून अपहरण करून पसार झालेल्या ४५ वर्षांच्या संशयित आरोपीला दीड महिन्याने जेरबंद करण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. संशयित आरोपी कर्जत तालुक्यातील आहे. त्याच्यावर पॉस्को, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम व बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणातील संशयित आरोपीला बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
करमाळा पोलिस ठाण्यात एका गावातून १४ वर्षांच्या मुलीला अनोळखी व्यक्तीने पूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा १४ सप्टेंबरला दाखल झाला होता. यामध्ये संबंधित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. संशयित आरोपीने अपहरण करताना एकही पुरावा ठेवला नव्हता. त्यामुळे तपास करणे पोलिसांपुढे आव्हान होते. मात्र संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. त्याला तब्बल दीड महिन्याने यश आले. संबंधित पीडित मुलीची संशयित आरोपीकडून सुटका केली असून तिला बाल कल्याण समितीच्या मार्फत काळजी व संरक्षणाची गरज ओळखून कायदेशीर प्रक्रिया करून श्री सय्यद यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा व पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीजा मस्के यांनी तपास केला. त्यांना पोलिस कॉन्स्टेबल एस. एन. गावडे यांनी मदत केली. मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपीचे यापूर्वी दोन विवाह झाले होते. पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी तो येत होता. त्याने तिच्याशी ओळख वाढवली. एकेदिवशी कशाची तरी पूस लावून तो तिला घेऊन पसार झाला. संबंधित पीडितेच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही.
नातेवाईकांनी याबाबत करमाळा पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर संशयित आरोपीचा शोध घेतला. मात्र संबंधित व्यक्तीचा फोन लागत नव्हता. तो कोठे गेला आहे याचा त्याने काहीच पुरावा ठेवला नव्हता. फोनचे सीम कार्ड त्याने मोडून टाकले होते. सर्व बाजूने तपास करूनही त्याचा पोलिसांना शोध लागत नव्हता. मात्र संबंधित घटनेतील फिर्यादीला एक दिवस अनोळखी नंबरवरून फोन आला. पोलिसानी त्या नंबरचा शोध घेऊन संशयित आरोपीला पालघर पोलिसांच्या मदतीने शोधले.
यातील अधिक मिळालेली माहिती अशी आहे की संशयित आरोपीने पीडित अल्पयीन मुलीला पालघर येथील एका जंगलात ठेवले होते. त्याने तिच्याशी बालविवाह केला होता. शिवाय तिच्यावर अत्याचारही केल्याचाही आरोप आहे. या तपासासाठी सायबर पथकाचीही मदत घेण्यात आली. यामध्ये संशयित आरोपीला करमाळा पोलिसांनी अटक केली आहे. याचा पुढील तपास सुरु आहे.
