Video : नाकाबंदी दरम्यान पाठलाग करत मोटारसायकल चोराच्या करमाळा पोलिसांनी आवळल्या मुसक्या! तब्बल १२ बाईक्स ताब्यात

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहर व तालुक्यात काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यावर पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रचंड ऍक्टिव्ह झाल्याचे चित्र दिसत आहे. तपासादरम्यान दोन चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून तब्बल १२ बाईक्स ताब्यात घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांना देण्यात आली आहे.

करमाळा तालुक्याचा पदभार घेतल्यापासून पोलिस निरीक्षक माने यांनी गुन्हेगारीवर आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. आषाढी वारीच्या दरम्यान चोरीच्या घटना घडू नयेत याबाबतही त्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात आता मोटारसायकल चोरांनाही पकडण्यात आल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. संशयीत आरोपी दिनेश भास्कर कदम (रा. घाटने, ता. माढा) व पृथ्वीराज गोट्या (रा. नेर्ले, ता. करमाळा) अशी यामध्ये पकडलेल्या चोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून ७ लाख २० हजाराच्या १२ बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत. त्यातील आठ मोटारसायकलीचे गुन्हे दाखल आहेत. तर चार मोटारसायकलची माहिती आरटीओकडून घेतली जात आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील म्हणाले, ‘संशयित आरोपी कदम हा मोटारसायकल चोरी करत आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर त्याचा तपास केला. त्याच्याकडे ११ मोटारसायकली सापडल्या. तर नाकाबंदी दरम्यान संशयित आरोपी गोट्या याला पाठलाग करून पकडण्यात आले. तेव्हा त्याच्याकडील मोटारसायकल चोरीचे असल्याचे समोर आले. वडशिवणे, कंदर, जेऊर, श्रीदेवीचामाळ यासही इतर ठिकाणावरून चोराने मोटारसायकली चोरल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *