करमाळा (सोलापूर) : दहिगाव उपसासिंचन योजनेचे पाणी ‘टेल टू हेड’प्रमाणे सोडावे व ओव्हरफ्लोचे पाणी नेर्ले पाझर तलावात सोडावे या मागणीसाठी झालेल्या रस्ता रोको प्रकरणात ४० शेतकऱ्यांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा- कुर्डुवाडी रस्त्यावर शुक्रवारी (ता. २३) आळसुंदे, नेर्ले, सालसे, निमगाव येथील शेतकऱ्यांनी आळसुंदे येथे आंदोलन केले होते. त्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल गणेश दळवी यांनी फिर्याद दिली आहे.
दहिगाव उपसासिंचन योजनेचे पाणी टेल टू हेड प्रमाणे सोडण्यात यावे या मागणीसाठी संजय धारेकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी १०.१० वाजता रस्ता रोको झाला. यावेळी ‘ओव्हरफ्लोचे पाणी नेर्ले पाझर तलावात सोडण्यात यावे, टेल टू हेडची अंमलबाजवणी करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी वाहतुकीस अढथळा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.