करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक देवानंद बागल व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे हे नुकतेच एका मंचावर दिसले. याशिवाय बागल आणि चिवटे यांचा फोटो एकाच बॅनरवर दिसला विशेष म्हणजे त्या बॅनरवर माजी आमदार पाटील यांचा फोटो नव्हता. त्यामुळे करमाळा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुरुवातीलाच पाठींबा दिलेला आहे. ते मोहिते पाटील समर्थक आहेत. चिवटे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे कार्यधिकारी मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत. चिवटे आणि पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मतभेद असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर पाटील यांना जिल्हा नियोजन समितीवर घेण्यात आले. सुरुवातीलाही ते जिल्हा नियोजन समितीवर होते. त्यानंतर आदिनाथ कारखान्याच्या प्रक्रियेत मंत्री सावंत यांनी पाटील यांना पुढे करत बारामती ऍग्रोकडे जाणारा कारखाना थांबवला. पुढे प्रशासकीय संचालक मंडळात सावंत यांनी चिवटे यांना संधी दिली. चिवटे यांना आता जिल्हा नियोजन समितीवरही घेतले आहे.
चिवटे आणि माजी आमदार पाटील यांच्यात राजकीय संघर्ष असल्याची अनेक उदाहरणे आहेत. आदिनाथ कारखाना सुरु करताना पाटील यांना विचारातही घेता आले नव्हते, असा आरोप केला जातो. काही दिवसांपूर्वी चिवटे यांनी जेऊर येथेही बॅनरबाजी केली होती. त्यात आता पाटील समर्थक बागल व चिवटे एकाच मंचावर दिसले आहेत. बागल हे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत. असे असले तरी ते सुरुवातीपासून म्हणजे शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून बागल व चिवटे अपवाद सोडला तर एकत्र दिसले नव्हते. आता मात्र ते एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना देवानंद बागल म्हणाले, ‘मी तालुक्यात माजी आमदार नारायण पाटील यांना नेता मानतो तर वर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री तानाजी सावंत हे आमचे नेते आहेत. त्यांच्या आदेशाने मी शिवसेना तालुका प्रमुख म्हणून करमाळा तालुक्यात काम करत आहे. पक्षाचा व माझ्या नेत्याचा आदेश माझ्यासाठी महत्वाचा आहे. शिवसेना वाढवण्यासाठी मी तालुक्यात प्रयत्न करत आहे.’
मोहिते पाटील व पाटील यांचा फोटो वगळला?
शिवसेनेच्या वतीने करमाळ्यात झालेल्या कार्यक्रमात चिवटे व बागल एका मंचावर आले होते. त्याच कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीकांत शिंदे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, मंगेश चिवटे यांच्यासह महेश चिवटे, ऍड. बाबुराव हिरडे, देवानंद बागल आदींचे फोटो आहेत. यामध्ये जिल्ह्यातील भाजपचे मोहिते पाटील व तालुक्यातील पाटील गटाचे नेते माजी आमदार नारायण पाटील यांचा फोटो दिसत नाही. हे फोटो वगळले असल्याची चर्चा सुरु आहे.