Karmala Politics करमाळ्यात ‘धनुष्यबाणा’मुळे बागल गटाला उभारी? मुख्यमंत्री शिंदेंची सभा टर्निंग पॉईंट, चिवटे ठरले गेम चेंजर!

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची झाली आहे. महायुतीचे उमेदवार (शिवसेना शिंदे गट) दिग्विजय बागल हे ‘रेस’मध्ये आले आहेत. गेल्या काही वर्षापासून राजकीय सत्तेपासून दूर असलेल्या बागल गटात यामुळे उत्साहाचे वातावरण दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे ‘मी आपल्या मागे ताकद देत असल्याचे सांगितले’ त्यामुळेही कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

महायुतीत करमाळ्याची जागा कोणाला हा विषय चांगलाच तापला होता. आमदार संजयमामा शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ त्यांच्याकडे जाणार असे निश्चित होते. मात्र आमदार शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचे ठरविले. आणि या जागेबाबत स्पर्धा रंगली. त्यावेळी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी फिल्डिंग लावून हा मतदारसंघ ‘धनुष्यबाणा’कडे ठेवण्यात यश मिळविले. यावेळी उमेदवारसाठी स्वतः इच्छुक असतानाही स्वतः दोन पावले मागे घेऊन त्यांनी बागल यांना उमेदवारी मिळण्यासाठी चिवटे आग्रही राहिल्याचे दिसून आले. त्यांची ही भुमिका करमाळा तालुक्यातील राजकारणात गेमचेंजर म्हणून पुढे आली आहे.

जागा वाटपाचा तिढा वाढत असताना चिवटे यांनी करमाळा मतदारसंघ शिवसेनेकडेच ठेवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. त्यावेळी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातही चर्चा झाली. अखेर वाटाघाटी होऊन शिवसेनेची उमेदवारी माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल यांचे पुत्र तर भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांचे बंधू दिग्विजय बागल यांना देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दरम्यान बागल गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर गटात उत्साह दिसू लागला आहे. बागल गटाचा जनाधार, शिवसेनेची ताकद आणि शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी पाच वर्षात केलेली कामे यामुळे दिग्विजय बागल यांची उमेदवारी प्रभावी ठरु लागली आहे. सुरुवातीला करमाळ्याची लढत संजयमामा शिंदे व महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील यांच्यात होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांची करमाळ्यात सभा झाली आणि शिंदे यांनी बागल यांच्या पाठीशी आपण आहोत, असे सांगितल्यानंतर बागल स्पर्धेत आले आहेत, असे बोलले जाऊ लागले आहे. करमाळा विधानसभा शिवसेनेचे प्रचार प्रमुख म्हणून महेश चिवटे काम पाहत असून त्यांनी बागल यांच्या विजयाचा गुलाल वर्षावर घेऊन जाणार आहोत. अशी खात्री व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *