करमाळा (सोलापूर) : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे जमा झालेले बील लाभार्थीला देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा प्रकार करमाळ्यात समोर आला आहे. याची तक्रार होताच गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांनी त्वरीत बील देण्याची सूचना केली आहे. मात्र त्यांच्या सूचनेचे पालन होणार का? हे पहावे लागणार आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून पात्र लाभार्थींना विहिरीसाठी अनुदान दिले जाते. बिटरगाव श्री येथील रामराव मुरूमकर यांना यातून विहीर मंजूर झाली होती. त्याचे काम दीड वर्षांपूर्वी पूर्ण झाले मात्र कुशलचे बिल अद्यापही जमा झालेले नाही. याबाबत रोजगार हमी योजना विभागात चौकशी केल्यानंतर संबंधित बिल ग्रामपंचायतीच्या खात्यात वर्ग केले असल्याचे सांगण्यात आले. मात्र संबंधित ग्रामसेवकाने बिल काढण्यासाठी लाच मागितली होती. लाभार्थी लाच देत नसल्याने त्यांनी बिल देण्यासाठी टाळाटाळ केली. लाभार्थीने लाच न देता वारंवार बिलाची मागणी केली मात्र संबंधित लाच मागितलेल्या श्री जाधव या ग्रामसेवकाने बिल दिले नाही.
याबाबत संबंधित लाभार्थीने गटविकास अधिकारी डॉ. कदम यांच्याकडे याबाबत तोंडी तक्रार केली. दरम्यान लाचखोर ग्रामसेवक श्री जाधव हे रजेवर गेले. त्यानंतर बिटरगाव श्री ग्रामपंचायतीला वैशाली साबळे या नवीन ग्रामसेवक आल्या आहेत. मात्र त्याही बिल देण्यासाठी सहीचा अधिकारी नसल्याचे सांगून टाळाटाळ करत आहेत. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर संबंधित बिल देण्याची सूचना केली आहे.