करमाळ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! एक कोटी चाळीस लाख खर्चाला मान्यता : महेश चिवटे यांची माहिती

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहराचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार आहे. दहिगाव येथील करमाळा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेल्या विद्युत मोटारी जुन्या असल्यामुळे सातत्याने बंद पडत आहेत. त्यामुळे पाणी उपसा होत नाही. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मागणीनुसार तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोटारी खरेदीसाठी निधी मंजूर केला होता. पण तांत्रिक अडचणी व राजकीय कुरगोडीमुळे रखडलेले हे काम मार्गी लागणार असल्याचे शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी सांगितले आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख चिवटे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची याबाबत भेट घेतली असून वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली आहे. यातील तांत्रिक अडचणी दूर करून तात्काळ या कामाला प्रशासकीय मंजुरी द्यावी, असा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. आता नवीन विद्युत मोटारी मिळणार असल्यामुळे दहिगाव येथून पूर्ण दाबाने पाणी उपसा होऊन करमाळा शहराला दररोज पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबरोबर पाणीपुरवठा योजनेला १० किलोमीटरवरील जेऊर सब स्टेशन येथून विज पुरवठा केला जातो. या जॅकलीन शेजारी 200 मीटरवर दहिगाव विद्युत सबस्टेशन आहे. येथून करमाळा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेला वीज कनेक्शन दिले तर पूर्ण क्षमतेने विजेचा दाब मिळून मोटारी पूर्ण क्षमतेने चलून करमाळ्याला कधीच पाणीपुरवठा कमी पडणार नाही. मात्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी जाणीवपूर्वक शेतकरी व काही लोकांच्या दबावाला बळी पडून करमाळा पाणीपुरवठा योजनेला विद्युत कनेक्शन देत नाहीत, असे चिवटे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ वीज वितरण कंपनीला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *