करमाळा (अशोक मुरूमकर) : तेरणा पट्ट्यातील मराठा समाजबांधव मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी आज (सोमवारी) मुंबईच्या दिशेने गेले आहेत. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही घरी परतणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे. मनोज जरांगे जो आदेश देतील तो आम्हाला मान्य आहे. मुलांच्या कल्याणासाठी त्यांनी हे आंदोलन सुरु केले असून त्याला आमचा पाठींबा आहे. ज्यांना यामध्ये सहभागी होता आले नाही त्यांनी लोकवर्गणी जमा करून आम्हाला पाठवले आहे, असेही त्यांनी करमाळा येथे ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तुगांव येथील मराठा समाज बांधव आज करमाळा मार्गे जरांगे यांच्या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी गेले आहेत. ते म्हणाले, जरांगे हे सकल मराठा समाजाचे प्रामाणिक नेतृत्व आहे. त्यांच्या मागे उभा राहणे हे आपल्या मुलांच्या हिताचे आहे. मुंबईत ते २६ जानेवारीपासून उपोषण करणार आहेत. मराठा समाजासाठी आरक्षण हे महत्वाचे आहे. आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे.
जरांगे यांच्या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी तुगांव येथील सहा गाड्यांमधून समाजबांधव गेले आहेत. सर्व साहित्य घेऊन ते रवाना झाले आहेत. जरांगे जो आदेश देतील तो मान्य करून आरक्षण घेऊनच आम्ही परतणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. गावातून आम्ही येत असताना सर्व गावकऱ्यांनी आम्हाला लोकवर्गणी करून सर्व साहित्य घेऊन पाठवले आहे. शेतातील कामे करण्याचे नियोजन करून आम्ही सर्वजण जात आहोत, असेही ते म्हणाले आहे.