करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा 1 लाख 20 हजार 837 मतांनी पराभव केला आहे. या निकालानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. राज्यातील निकाल पहाता भाजपवरील नाराजीचाही परिणाम झाला असल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे.

माढा लोकसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याआधीपासूनच चर्चेत होती. येथे धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची अनेक दिवसांपासून तयारी केली होती. त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी अशा मोहिते पाटील समर्थकांना होती. त्यानुसार मोर्चेबांधणीही केली होती. मात्र पहिल्याच यादीत भाजपने त्यांना डावलत निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करून शरद पवार यांच्या ‘तुतारी’वर निवडणूक लढवण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतरही मोहिते पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करून कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले. दरम्यान भाजप उमेदवारी बदलेल अशी शक्यता निर्माण झाली होती किंवा मोहिते पाटील बंडखोरी करणार नाहीत अशी सुरुवातीला चर्चा होती. तर काहींच्या मते मोहिते पाटील यांच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात होती. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक लढवणे आवश्यक असल्याचे बोलले जात होते.

निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थक कमालीचे नाराज झाले होते. तेव्हा भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीष महाजन स्वतः ‘शिवरत्न’वर आले होते. त्यांच्याकडे निंबाळकर यांची उमेदवारी बदलण्याची मागणी हजारो कार्यकर्त्यांनी केली होती. दरम्यान महाजन यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर भाजपकडून काहीही बदल झालेला दिसला नाही. तेथून पुन्हा भाजपबद्दल असलेल्या नाराजीत भर पडत गेली. शेवटी भाजपने उमेदवारी दिली तरी घेईची नाही असे मत कार्यकर्त्यांचे झाले होते. अकलूज येथे काही कार्यकर्त्यांनी तर करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे व माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे कार्यकर्ते देखील आपल्याला मदत करणार असल्याचे सांगितले होते. तेव्हा भाजपच्या विरोधात संतापाची एवढी लाट जाईल याचा अनेकांना अंदाजही नव्हता. मात्र तेव्हा डॉ. अमोल घाडगे यांनी गिरीष महाजन यांच्या कानात याचा परिणाम राज्यात होईल, असे सूचित केले होते. ते विधान तेव्हा हस्यास्पद वाटत होते. परंतु आता ते खरे झाले आहे.

निंबाळकर यांचा प्रचारही जोरदार सुरु होता. करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, माळशिरसचे आमदार राम सातपुते व माणचे आमदार जयकुमार गोरे हे प्रचारात होते. मात्र त्याचा फायदा झाला नसल्याचे निकालावरून दिसत आहे. रामराजे निंबाळकर यांनी निंबाळकर यांना फटका बसू शकतो हे आधीच सांगितले होते. मात्र मात्र यांच्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नसल्याचे स्पष्ट झाले होते. निंबाळकर यांची प्रचार यंत्रणाही सक्षम होती, मात्र सामान्य मतदारांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.
पवारांकडून मामांना स्पॉफ्ट कॉर्नर! कारखान्यावरून बागल टार्गेट

निंबाळकर यांच्यासाठी प्रचार सुरु असताना आढावा बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी थेटपणे नाराजी व्यक्त केली होती. निंबाळकर यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची अडवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला होता. तेव्हा आमदार शिंदे यांना विधानसभेला सहकार्य करून मात्र आता आम्हाला आमच्या मनाने मतदान करायचे आहे, असे स्पष्टपणे सांगितले जात होते. याकडे भाजप पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने पाहिले नाही. नको त्या कार्यकर्त्यांना बळ दिले जात असल्याचा आरोप भाजप व मित्रपक्षातील कार्यकर्ते खासगीत बोलून दाखवत होते.
विश्लेषण : शरद पवारांची करमाळ्यात जबरदस्त खेळी! सभेशीवाय ‘या’ तीन घटनांमुळे राजकीय चर्चांना उधाण

मोहिते पाटील हे त्यांच्या संस्था आर्थिक अडचणीत असल्याने व त्यांना केलेल्या मदतीमुळे बंडखोरीचा निर्णय घेणार नाहीत, असा अंदाज बांधला जात होता. मात्र मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर चित्र बदलत गेले. निंबाळकरांच्या तुलनेत मोहिते पाटलांची प्रचार यंत्रणा अपुरी होती. मात्र सर्वसामान्य मतदारांनी भाजपविरोधी मतदान केल्याने निकाल बदलला.

मोहिते पाटलांसाठी हे मुद्दे फायद्याचे ठरले

  • तरुणांच्या व शेतकऱ्यांच्या मनात शरद पवार यांच्याबद्दल असलेले स्थान
  • उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती
  • भाजपबद्दल असलेली नाराजी
  • शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत झालेला प्रवेश
  • माजी आमदार नारायण पाटील यांनी केलेला प्रचार
  • निंबाळकर यांच्यावर असलेली नाराजी
  • मराठा आरक्षणामुळे भाजप व निंबाळकरांवर असलेली नाराजी
  • शेतमाल, दुधाला नसलेले दर यामुळे शेतकऱ्यांमध्ये असलेला संताप
  • बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, ऍड. शिवराज जगताप, पाटील गटाचे समर्थक देवानंद बागल, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, सावंत गटाचे सुनील सावंत, प्रा. रामदास झोळ, ठाकरे गटाचे शाहूदादा फरतडे, बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, सवितादेवी राजेभोसले, काँग्रेसचे पदाधिकारी आदींनी करमाळ्यात केलेला प्रचार

निंबाळकरांना का नाकारले?

  • गेल्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील निंबाळकरांबरोबर होते. आता उमेदवारीवरून मोहिते पाटील यांनी बंडखोरी केल्याचा परिणाम
  • निंबाळकर यांनी पाच वर्षात नकोत्या व्यक्तींना बळ दिल्याचा आरोप केला जात आहे.
  • गेल्यावेळी ज्या व्यक्तींनी विजयासाठी प्रयत्न केले त्यांनाच डावलले जात असल्याची भावना
  • मराठा आरक्षणासाठी देण्यात आलेल्या निवेदनावर सही नसल्याने समाजबांधवांची नाराजीचा फटका
  • विकास कामे केली नसल्याचा आरोप
  • भाजपविरोधी सर्वसामान्य मतदारांची झालेली मानसिकता

करमाळा विधानसभा मतदारसंघात बागल, शिंदे व जगताप निंबाळकरांबरोबर तरीही…

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *