मुंबई (काय सांगता न्यूज पोर्टल) : राज्य विधिमंडळाचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाचे कामकाज येत्या गुरुवारी (ता. ७ डिसेंबरपासून) सुरु होणार असून २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. पहिल्या आठवड्यात दोन दिवस, दुसऱ्या आठवड्यात पाच दिवस तर तिसऱ्या आठवड्यात तीन दिवस सभागृह चालणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यात सत्ता समीकरण बदलल्यानंतर पहिल्यांदाच उपराजधानी नागपुर येथे अधिवेशनासाठी सरकार येणार आहे.
शेतकऱ्यांवर दुष्काळ व अवकाळी पावसामुळे आलेले आसमानी संकट, घोषणांच्या पूर्ततेसाठी पुरवणी मागण्या आणि संपूर्ण राज्यात ऐरणीवर आलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न असतानाही सरकारने हिवाळी अधिवेशनाचे कामकाज १४ दिवसांचे असून त्यातील प्रत्यक्ष कामकाजाचे फक्त १० दिवस निश्चित केले आहेत. निवडणुकीचे वर्ष व इतर ज्वलंत मुद्दे असताना राज्यकर्त्यांनी अधिअवेशनासाठी हात आखडता घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.याबद्दल विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवर यांनी विदर्भाला न्याय कसा दिला जाणार यावर प्रश्न केला आहे.
मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांचा मुद्दा राज्यभर तापलेला आहे. आरक्षण, शेतकऱ्यांना मदत आणि पुरवणी मागण्या यावर अधिवेशनाचा बहुतांश वेळ जाणार आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने सर्वांना वेध लागले आहेत. विद्यमान सरकारचे नागपुरातील हे अखेरचे अधिवेशन आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्यावर्षी विरोधी पक्षात होते. सदस्य अपात्रतेबाबत सुरू असलेली सुनावणी आणि बदललेल्या समीकरणामुळे महाविकास आघाडीचा ताळमेळदेखील लक्ष वेधणारा राहणार आहे. अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव व पुरवणी मागण्या मांडण्यात येतील. लोकसभा निवडणुकीच्या आधी चार महिने हे अधिवेशन असल्याने ६० हजार कोटींवर पुरवण्या मागण्या जातील, अशी शक्यता आहे. ११ व १२ डिसेंबरला यावर चर्चा होईल.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शासकीय कामकाजात मराठा आरक्षणाचा मुद्दा येण्याची शक्यता आहे. लगेच दोन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. सोमवार व मंगळवारी शासकीय कामकाज आणि पुरवणी मागण्यांवार चर्चा आहे. नंतरचे तिन्ही दिवस शासकीय कामकाज आहे. परत दोन दिवस सुट्ट्या राहतील.