करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे करमाळा येथील कनिष्ठ अभियंता विशाल सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून आळजापूर येथील चार शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भारत रामचंद्र गपाट, ज्ञानदेव भारत गपाट, किसन पंढरीनाथ गपाट व अर्जुन भारत गपाट अशी गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
कनिष्ठ अभियंता सूर्यवंशी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘आळजापूर येथे रेग्युलर वीज बील वसूलसाठी आम्ही कर्मचाऱ्यांसह गेलो होतो. तेव्हा गपाट वस्तीवर गुन्हा दाखल झालेल्या संशयितांनी विद्युत ट्रान्सफार्ममधून अनधिकृतपणे वीज घेतल्याचे दिसले. तेव्हा कर्मचाऱ्यांमार्फत आम्ही ही वीज जोडणीची केबल काढत असताना संबंधित व्यक्ती तेथे आले व ही केबल का काढता असे विचारले. तेव्हा त्यांना ही अनधिकृत केबल असल्याचे त्यांना सांगण्यात आले. दरम्यान त्यांनी ही केबल कशी काढता व नेहते हे पहातो असे म्हणून शासकीय कामात अढथळा निर्माण केला.’ संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

