करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात महायुती विकासाच्या मुद्यावरच निवडणूक लढणार आहे, असे भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी स्पष्ट केले आहे. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बागल यांनी आज (शनिवारी) बागल गटाच्या संपर्क कार्यालयात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या.
भाजप नेत्या रश्मी बागल यांचे बंधू दिग्विजय बागल हे करमाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या धन्युष्यबाणावर निडणूक रिंगणात उतरले आहेत. करमाळ्यात बागल गट, जगताप गट, पाटील गट व शिंदे गट हे पारंपरिक विरोधी गट आहेत. तालुक्यात पक्षापेक्षा गटातटाचे राजकारण जास्त चालते. येथे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील, अपक्ष आमदार संजयमामा शिंदे व शिवसेनेचे दिग्विजय बागल यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.
भाजपच्या बागल म्हणाल्या, ‘करमाळा तालुक्यात दिगंबरराव बागल मामा यांच्यापासून आम्ही विकासाचे राजकारण करत आहोत. तालुक्यातील सर्वसामान्य माणूस हाच केंद्र मानून आम्ही काम केले आहे. शिक्षण, आरोग्य, रस्ता, वीज, शेती व सिंचन हे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. पुढेही आम्ही विकासाच्या कामावरच लढणार आहोत.’ तालुक्यातील साखर कारखान्यांबाबतीतही यावेळी चर्चा झाली.
स्व. दिगंबरराव बागल यांनी करमाळ्यात पायभूत सुविधा पुरवण्यावर भर दिला. त्याचप्रमाणे माजी आमदार शामल बागल यांनीही मतदारसंघात काम केले. करमाळ्यातील मतदारांना सर्वात तरुण आमदार देण्याची संधी असल्याचेही गप्पा मारत असताना म्हणाल्या आहेत. आरोग्याबाबतही आम्ही काम केले आहे. फक्त प्रसिद्धीसाठी आम्ही कधीही काम केले नाही. पाठपुराव्याची आमच्याकडेही अनेक पत्रे आहेत, असे यावेळी त्या म्हणाल्या. करमाळा मतदारसंघात महायुतीचे घटक पक्षाचे पदाधिकारी यांना घेऊन आम्ही ही निवडणूक लढत आहोत, असे यावेळी भाजपच्या बागल म्हणाल्या.