करमाळा (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता होती. मात्र शेवटपर्यंत चार उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने नऊ जागांसाठी निवडणूक लागली आहे. यासाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. परंतु बागल गटाच्या यशस्वी खेळीमुळे आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत. निवडणूक लागलेल्या जागांपैकीही चार जागा बागल गटाच्याच येणार आहेत. मात्र ते कोण असतील हे निकालानंतरच समजणार आहे. या निवडणुकीत राखीव जागांपैकी सुनीता गिरंजे यांचा अर्ज राहिल्याने चिखलठाण व वांगी गटातही मतदान होणार असून महिलाच्या दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी शुक्रवारी (ता. १६) मतदान होणार आहे. अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप तिजोरे व नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली झाली. पोलिस उपनिरीक्षक मिटू जगदाळे यांनी बंदोबस्त ठेवला होता.
मकाई सहकारी साखर कारखाना सुरुवातीपासून बागल गटाच्या ताब्यात आहे. यावेळच्या निवडणुकीत पहिल्यांदाच ७५ अर्ज दाखल झाले होते. मात्र त्यातील ३१ अर्ज अपात्र ठरले. त्यात प्रा. रामदास झोळ, माया झोळ व मोहिते पाटील समर्थक जिल्हा परिषदेच्या सदस्या सविताराजे राजेभोसले आदींचे अर्ज अपात्र ठरल्याने निवडणुकीची रंगत कमी झाली होती. त्यानंतर राहिलेले उमेदवार माघार घेतील, अशी शक्यता होती. मात्र त्यांनी माघार न घेतल्याने निवडणूक लागली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वांगी ऊस उत्पादक गटातून अमित केकान यांनी माघार घेतल्याने बागल गटाचे युवराज रोकडे व सचिन पिसाळ हे बिनविरोध झाले आहेत. याशिवाय भिलारवाडी ऊस उत्पादक गटातून बाबुराव औदूंबरे यांनी माघार घेतली असली तरी येथे बागल विरोधी गटाच्या सुनीता गिरंजे व अप्पासाहेब जाधव यांचे अर्ज असल्याने येथे निवडणूक लागली असून दोन जागेसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत.
मांगी ऊस उत्पादक गटात दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. सुभाष शिंदे, अमोल यादव व दिनेश भांडवलकर यांच्यात ही लढत होणार आहे. त्यांच्यापैकी दोघे विजयी होणार आहेत. यात एक जागा बागल गटाची असेल मात्र ती कोणाची असेल हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत वांगी आणि चिखलठाण हे ऊस उत्पादक गट बिनविरोध झाले असले तरी महिला राखीवसाठी सभासदांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. तीन महिलांपैकी दोन महिला विजयी होणार आहेत.
अशी होईल गटनिहाय निवडणूक
भिलारवाडी : या गटामध्ये दोन जागा निवडून द्यायच्या आहेत. त्यासाठी चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अजित झंजुर्णे व रामचंद्र हाके हे बागल गटाचे उमेदवार असून त्यांच्याविरुद्ध सुनीता गिरंजे व अप्पासाहेब जाधव हे उमेदवार असणार आहेत. पारेवाडी गटात तीन जागा निवडून द्यायच्या असून येथे बागल गटाचे बाळासाहेब पांढरे, रेवणनाथ निकत व संतोष पाटील हे उमेदवार आहेत. त्याच्याविरुद्ध गणेश चौधरी हे असणार आहेत. चौधरी हे बागल गटाचे बंडखोर उमेदवार आहेत. यातील दोन जागा या बागल गटाच्या येणार आहेत हे निश्चित आहे. मात्र त्या कोणत्या ते निकालानंतर समजणार आहे.
महिला राखीवमध्ये बागल गटाच्या कोमल करगळ व अश्विनी झोळ हे उमेदवार आहेत. त्यांच्याविरुद्ध सुनीता गिरंजे या उमेदवार आहेत. या दोन जागांसाठी बिनविरोध झालेल्या चिखलठाण आणि वांगी या गटातही मतदान होणार आहे. यातील एक जागा बागल गटाची येणार आहे. बिनविरोध झालेल्या गटात कसे मतदान असणार इतर उमेदवारांन मतदान असणार का फक्त राखीव उमेदवारांना मतदान असणार याबाबत मात्र संभ्रम असून स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही.
बागल गटाच्या या जागा आहेत बिनविरोध
चिखलठाण गटातील सतीश नीळ व दिनकर सरडे. वांगी गटातील युवराज रोकडे व सचिन पिसाळ. सहकारी संस्था मतदार संघातील नवनाथ बागल. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मतदार संघातील आशिष गायकवाड व अनिल अनारसे. भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी गटातील बापू चोरमले हे बिनविरोध झाले आहेत.
या निवडणुकीत बागल गटाची सरशी ठरली आहे. निवडणूक लागेलेल्या जागांमध्येही बागल गटाच्याच बहुतांश जागा विजयी होतील. मात्र निवडणूक बिनविरोध झाली नाही. या निवडणुकीमुळे पुन्हा एखादा सर्व मतदारांपुढे जावे लागणार आहे.