करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सुरु झाली असून परिसरात मात्र शुकशुकाट आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांच्या नियंत्रणाखाली ही मतमोजणी सुरु झाली आहे. सुरुवातीला प्रत्येक टेबलवर मतपेट्या घेऊन मतपत्रिकेची विभागणी करण्यात आली आहे. त्यानंतर २५- २५ मतपत्रिकेचे गट्टे केले जाणार असून त्यानंतर मतमोजणी केली केली जाणार आहे. भिलारवाडी, पारेवाडी, मांगी व महिला प्रतिनिधी गटाची मतमोजणी पहिल्यांदा होणार आहे.
मतदान मोजणी केंद्रात मोबाईल वापरण्यास निर्बंध घातले असल्याने माहिती मिळण्यास अडचण येत आहे. तहसील परिसरात सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत निकाल ऐकण्यासाठी कोणीही नव्हते. बागल कार्यालयाच्या परिसरात मात्र तुरळक कार्यकर्ते जमा होऊ लागले आहेत. तहसील कार्यालय परिसरात भिलारवाडी ऊस उत्पादक गटातील उमेदवार सुनीता गिरंजे यांचे पती प्रकाश गिरंजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, बागल गटाचे संदीप शेळके, राजेंद्र झंजुर्णे उपस्थित आहेत.