सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील दरिद्रय रेषेखालील व गरजू घटकांचा आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिअधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. संबधितांनी या महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. एच. चव्हाण यांनी केले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) मार्फत मांग, मातंग, मिनी, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारूडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील लोकांमध्ये शिक्षणाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे, परंतू उत्पन्नाच्या साधनाच्या अभावामुळे आर्थिक परिस्थिती असल्याने महामंडळ व राष्ट्रीयकृत बँकेमार्फत विविध योजना राबविण्यात येतात. राष्ट्रीयकृत बँकामार्फत मातंम समाज व तत्सम जातीतील लोकांची व्यवसाय करण्याची पात्रता असूनही कर्ज मंजूर केले जात नाही.

समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबई व राष्ट्रीय अनुसुचीत जाती वित्त विकास महामंडळ, दिल्ली यांचेमार्फत सुविधा कर्ज योजना- कर्ज मर्यादा रक्कम ५ लाख, लघु ऋण वित्त योजना- कर्ज मर्यादा रक्कम १.४० लाख, महिला समृध्दी योजना- कर्ज मर्यादा १.४० लाख व शैक्षणिक कर्ज योजना- कर्ज मर्यादा देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी- रक्कम ३० लाख व परदेशातील अभ्यासक्रमासाठी रक्कम ४० लाख याप्रमाणे योजना सुरु करण्यात येणार असून त्यानुसार जिल्हा कार्यालयांना उदृष्टि प्राप्त झालेले आहे. सदर योजनांची माहिती महामंडळाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अर्जदारांना येणाऱ्या अडीअडचणींचा विचार करुन महामंडळामार्फत वेबसाईट प्रणाली विकसित करण्यात आली आहे राष्ट्रीय अनुसुचीत जाती वित्त विकास महामंडळ, दिल्ली (NSFDC) योजनांचे अर्ज ऑन लाईन पध्दतीने https://beta.slasdc.org” हया वेबसाईट प्रणालीवर सादर करावेत.
महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील गरजू व होतकरु लोकांनी मुदत कर्ज योजना, लघु ऋण वित्त योजना, महिला समृध्दी योजना, शैक्षणिक कर्ज योजना हया कर्ज योजनांचे लाभ घेण्यासाठी सदरचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने https://beta.slasdc.org हया वेबसाईट प्रणालीवर सादर करावेत असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, श्री. चव्हाण यांनी केले आहे.