करमाळा (सोलापूर) : मणिपूर येथील अत्याचार प्रकरणाचा करमाळ्यात बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. याबाबत बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. काँग्रेसचे गाभुरभाई शेख, वाशिंबेचे भगवान डोंबाळे, पोथरेचे शहाजी झिंजाडे, मराठा सेवा संघाचे सचिन काळे आदी यावेळी उपस्थित होते.
बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष कदम यांनी मणिपूर येथील घटनेवरून भाजप सरकारवर निशाणा साधला. मनात चिड निर्माण करणारी मणिपूरची घटना आहे. देशात महिला सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न यातून निर्माण होत असून यातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नायब तहसीलदार शैलेश निकम यांनी यावेळी निवेदन स्वीकारले. करमाळा पोलिसांनी येथे बंदोबस्त ठेवला होता.