नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुंबईत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मी हे आश्वासन दिले आहे. कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण दिले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे. (Maratha reservation will be given without affecting the reservation of OBC Chief Minister Eknath Shinde)
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत शिंदे यांनी माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी केले जाणार नाही, सर्वांना विश्वासात घेऊन आरक्षण दिले जाणार आहे. विरोधी पक्षाचीही आरक्षण देण्यासाठी मदत मिळत आहे. यासाठी सर्व पक्षीयांचाही ठराव झाला आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत बसणारे आम्ही आरक्षण देणार आहोत, असे त्यांनी सांगितले आहे. २४ तारीखेला अजून वेळ आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे.