करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. मात्र सर्वसामन्य नागरिकांची कामे मध्यस्थिशीवाय करा’, असे आवाहन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी केले आहे.
करमाळा येथील नालबंद मंगल कार्यालय येथे इंडिया आघाडीची आज (शुक्रवार) बैठक झाली. शिवसेनाचे (ठाकरे गट) प्रविण कटारीया, काँग्रेसचे सुनिल सावंत, दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ, शिवसेना जिल्हा प्रमुख शाहुदादा फरतडे, दत्तकला शिक्षण संस्थेच्या माया झोळ, सावंत गटाचे पप्पू सावंत, शंभूराजे फरतडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे आदी उपस्थित होते.
कांबळे म्हणाले, मोहिते पाटील यांना आमचा पाठींबा आहे. या निवडणुकीत भाजपविरोधी लाट आहे. ही निवडणुक हुकुमशाहीविरुद्ध लोकशाही अशी आहे. आम्ही इंडीया आघाडीच्या माध्यमातुन काम करणार आहोत. या मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला वातावरण चांगले आहे. भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निष्क्रीय आहेत, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. त्यांनी छोट्या माणसाला जवळ करुन पाच वर्षात काम केले. नागरिकांना त्यांनी विश्वासात घेतले नाही. काहीजण चळवळीतील माणंस पुढे नको म्हणून आम्हाला टाळत आहेत. ही निवडणुक सामान्य माणसाच्या अस्तित्वाची आहे. देशात लोकशाही, महागाई, बेरोजगारी वाचवायची असेल तर उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशीवाय पर्याय नाही. आमच्या चळवळीमुळे मकाईचे पैसे जमा झाले आहेत. प्रस्थापीतांना शह देण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. मी व सुभाष आण्णा सावंत हे सुरुवातीपासून मोहिते पाटील समर्थक होतो. मात्र आम्हाला डावलले गेले होते. आता आम्ही मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी परिश्रम घेत आहोत. संघर्ष समिती येणार्या काळात पर्याय म्हणून काम करणार आहे, असेही ते म्हणाले.
सावंत म्हणाले, मतदारांनीच ही निवडणुक हातात घेतली आहे. त्यामुळे कोणताही नेता नसताना हे सर्व एकत्र आले आहेत. पंढरपूरचे अभिजीत पाटील हे भाजपत येत नव्हते म्हणून कारवाई केली. त्यांच्यावर कारवाई झाली असली तरी ते काम इंडीया आघाडीचे काम करतील. हुकुमशाही संपवण्यासाठी मतदान करा. करमाळ्यात सर्व नेते मंडळी एकीकडे आणि मतदार एकीकडे आहे.
फडतरे म्हणाले, निंबाळकर यांनी मांगीच्या तलावात कुकडीचे पाणी आणले नाही. या तालुक्याला कुकडीच्या पाण्याची गरज आहे. अभिजीत पाटील हे शरद पवार यांच्या मंचावर असताना कारवाई केली. आपल्या जिल्ह्यातीलच खासदार करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. प्रा. झोळ म्हणाले, ‘जनतेने निवडणुक हातात घेतल्याने कोणताही नेता नसताना लोक एकत्र आले आहेत. ईडी, सीबीआयचा धाक दाखवून कारवाई केली जात आहे. भाजपकडे वॊशिंग मशीन असल्याचे सांगितले जाते, असे म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.