करमाळा (अशोक मुरूमकर) : उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी (ता. ३) सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी आज (बुधवारी) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे करमाळा तालुकाध्यक्ष भारत अवताडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष अवताडे ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यावेळी जिल्ह्यासह करमाळा तालुक्यातील अनेक प्रश्न त्यांच्यासमोर मांडले जाणार आहेत. करमाळा तालुक्यात आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे केली जात आहेत. तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु असून आम्ही पदाधिकारीही रखडलेले प्रश्न उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मार्गी लागावेत म्हणून मांडणार आहोत. आजच्या बैठकीला युवकचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, राजकुमार देशमुख, अशपाक जमादार, बापू तांबे आदी उपस्थित होते.
महायुती सरकारमधून उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे शनिवारी पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आपल्या प्रत्येक भागात अजितदादांचे बॅनर लावावेत, या मेळाव्याला आपल्या भागातून जास्तीत जास्त कार्यकर्ते उपस्थित राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, अशा सूचना या बैठकीत जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी केल्या आहेत असे तालुकाध्यक्ष अवताडे यांनी सांगितले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आपली संघटनात्मक बांधणी करून सोलापूर जिल्ह्यात अजित पवारांची ताकद सिद्ध करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
या बैठकीला जिल्हा खजिनदार राजेंद्र हजारे, माळशिरसचे नेते उत्तम जानकर, पंढरपूरचे नेते कल्याणराव काळे, दक्षिणचे बाळासाहेब बंडगर, महिला आघाडीच्या लातूर निरीक्षक सुवर्णा झाडे, राष्ट्रवादीचे युवक आघाडी यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन, शहर राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन यासह सोलापूर जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहराचा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.