करमाळा (सोलापूर) : लोकमंगल बँक, दूध डेअरी अध्यक्ष असोसिएशन, छत्रपती दूध संकलन व शीतकरण केंद्राच्या वतीने आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत करमाळ्यात नुकताच स्नेहसंवाद मेळावा झाला. छत्रपती दूध संकलन केंद्राचे अजिंक्य पाटील व शिवाजी पाटील, लोक विकास डेअरीचे अध्यक्ष दीपक देशमुख, शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे, बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय आडसुळ यांच्यासह लोकमंगल बँकेचे व पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आमदार देशमुख यांनी यांनी यावेळी दुग्ध व्यावसायिकांना व्यवसाय वाढीबाबत मार्गदर्शन केले. दूध उत्पादन वाढीसाठी बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देऊन आर्थिक सक्षम करण्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रातिनिधिक स्वरुपात दूध संकलन केंद्र चालकांना बँकेच्या वतीने अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत मंजूर झालेल्या धनादेश देण्यात आले.

‘दुधावर प्रक्रिया करून विविध दुग्धजन्य पदार्थ तयार करावेत. लोकमंगलच्या माध्यमातून विविध महामंडळाच्या (व्याज परतावा) योजनांचे तसेच फूड प्रोसेसिंग योजनेचा लाभ देऊन सरकारच्या वतीने मदत करण्यास तयार आहे’, असे देशमुख म्हणाले. ‘दूध संस्था चालकांनी पशुखाद्य निर्मिती करून शेणखत तयार करून, गोमूत्रवर प्रक्रिया करून त्याची विक्री करून उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना मदत करत आर्थिक सक्षम होण्याचे आवाहन त्यांनी केले.