सोलापूर : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने विविध शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. या शिष्यवृत्ती योजनांची एकत्रित माहिती विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधींना व्हावी, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आज (गुरुवार) सकाळी १० ते १२ यावळेत ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. नलिनी टेंभेकर यांनी केले आहे.
राज्यातील शासकीय महाविद्यालये, सरकार अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खासगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस सरकारच्या सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process-CAP) (व्यवस्थापन कोट्यातील संस्था स्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी, ज्या मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवगांतील, सामायिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या (अर्जाचे नूतनीकरण केलेल्या) मुलींना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के लाभाऐवजी १०० टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू करण्यात आले आहे.
शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये १०० टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ, कुटुंबाचे आर्थोक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे,अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या), आणि महिला व बाल विकास विभागाच्या दि. ६ एप्रिल २०२३ नुसार “संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये १०० टक्के सवलत देण्यात येत आहे. अशा सर्व योजनांची माहिती या वेबिनारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी वेबीनार लिंक http://www.parthlive.com असून सोलापूर जिल्हयातील सर्व अशासकीय अनुदानित, विनाअनुदानीत व कायम विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी व अध्यापक महाविद्यातील सर्व विद्यार्थी, पालक, संस्था प्रतिनिधी यांनी सदरील संवाद कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहनही उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. नलिनी टेंभेकर यांनी केले आहे.