पुणे (मनोरंजन प्रतिनिधी) : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर भारतातील रुपेरी पडद्यावर प्रभू श्रीरामांची महिमा उलगडणारा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीरामांना प्रेक्षकांना पाहण्याची संधी पहिल्यांदाच रसिकप्रेक्षक आणि महाराष्ट्रातील रामभक्तांना मिळणार आहे.
अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर भारतातील कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण तेथे झाले नसून ही संधी दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे त्यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाद्वारे उपलब्ध झाली आहे. भारतीय इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असलेल्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांना प्रभू श्रीरामांच्या अयोध्येचे मनोहारी दर्शन या चित्रपटातून येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांतून होणार आहे. या चित्रपटाच्या विशेष प्रमोशन्ससाठी आज या चित्रपटाचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे लेखक दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे, चित्रपटातील व्यक्तिरेखा छत्रपती शिवाजी विद्यालय, संभाजी नगर या शाळेचे इतिहास विषयाचे शिक्षक अजित देशमुख सर यांची व्यक्तिरेखा साकारणारे निलेश देशपांडे व कारसेवक विचारे यांच्या भूमिकेतील डॉ. अभय कामत आणि अभिनेत्री तेजस्वी पाटील, सागर गुंजाळ इत्यादी खास उपस्थित होते.
मिशन अयोध्या
दिग्दर्शकाचे मनोगत
लेखक – दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे
प्रत्येक चित्रपट दिग्दर्शित करीत असताना मी त्या विषयाशी प्रामाणिक राहून त्या गोष्टीला न्याय देण्याचा दिग्दर्शक म्हणून नेहमी प्रयत्न करतो. अशावेळी जेव्हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय त्या चित्रपटाच्या गोष्टीशी निगडित असतो तेव्हा मी त्या चित्रपटाशी भावनिक पातळीवर जोडला जातो. आणि तो चित्रपट माझ्यासाठी खास बनतो. असंच काहीसं या “मिशन अयोध्या”चित्रपटाबद्दल माझ्यासोबत घडले आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा बाबरी मस्जिद जमीन दोस्त झाली. भारताच्या इतिहासातील ती एक अभूतपूर्व घटना होती. त्या घटनेच्या परिणाम सर्व देशवासीयांच्या मनावर झाला त्याला मी सुद्धा अपवाद नव्हतो. एका मोठ्या न्यायालयीन संघर्षानंतर रामजन्मभूमी मंदिराला परवानगी मिळाली आणि अयोध्ये मध्ये भव्य राममंदिर उभं राहिलं. पण त्यामुळे भारतीय राजकारणाला मिळालेल्या दिशेशी माझं मन संतुष्ट नव्हतं आणि पुढच्या पिढ्यांचा जेव्हा मी विचार करू लागलो तेव्हा मानसिक त्रास होऊ लागला आणि मनात निर्माण झालेली विचारांची घुसमट असह्य होऊ लागली. म्हणूनच प्रभू श्रीरामांनी घुसमट बाहेर व्यक्त करण्यासाठी “मिशन अयोध्या” चित्रपटाची योजना केली असावी असं मला वाटतं. माझ्या निर्मात्यांनी या मिशनला सिनेमाच्या रूपात सत्यात उतरवण्यासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
“मिशन अयोध्या” हा एक चित्रपट नसून एक आव्हानात्मक प्रवास आहे, जो प्रत्येक राम भक्ताला, देशवासीयांना आपल्या सोबत पुढे नेणारा आहे. हे “मिशन” प्रभू श्रीरामाच्या हृदयाशी प्रत्येकाला जोडणारा आहे तोडणारे नव्हे
“मिशन अयोध्या” चित्रपटाविषयी…… (synopsis)
मिशन सैनिकांचे असते, मिशन अतिरेक्यांचे असते. मग मिशन एका शिक्षकाचं का नसावं? असामान्य महानायकांचा इतिहास वाचत असताना आपलंही एक पान इतिहासात असावं, ही इच्छा मनाशी बाळगून आयुष्य जगणाऱ्या एका सामान्य शिक्षकाची एक असामान्य कथा आहे. अजित देशमुख हा इतिहास विषयचा शिक्षक असूनही छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या चरित्रावर व्याख्याने गाजवणारा प्रभावी वक्ता सुद्धा आहे. त्यांनी एका मिशनला पुढचे आयुष्य समर्पित करायचे ठरवले आहे. ज्याचं नाव आहे “मिशन अयोध्या”.
साधारण पाचशे वर्षाच्या एका अभूतपूर्व संघर्षानंतर भारतातील अयोध्यामध्ये सरते शेवटी श्री राम जन्मभूमी मंदिर उभारले गेले, त्या घटनेने देशमुख सर प्रभावित होतात. रामजन्मभूमी मंदिर उभारलं गेलं, पण पुढे काय? मंदिर उभारलं पण श्रीरामाच्या विचारांचं काय? असे त्यांच्यासमोर बरेच प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांनी स्वतः ते बेचैन होतात आणि प्रभू श्रीराम ही त्यांची अस्वस्थता बनते कारण ते ज्या छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना आपला आदर्श मानतात त्या आदर्शांचा आदर्श श्रीराम आहे. अयोध्यात निर्माण झालेले भव्य मंदिर रामराज्याची सुरुवात असायला हवी, पुढच्या पिढ्यांना आदर्श राजा रामाचा इतिहास आपण सांगायला हवा. श्रीराम हा संपूर्ण विश्वाचा आहे त्याला कोणताही धर्म, जात-जमात अपवाद नाही. श्रीराम हा कोणाच्या द्वेषाचा, तिरस्काराचा विषय नसावा. त्याला सर्वांनी स्वीकारायला हवं असं त्यांचं आदर्श चरित्र आहे आणि हा विचार सर्व समाजात पोहोचवणं, तो पुढच्या पिढ्यात रुजवणे आणि रामराज्याकडे वाटचाल करणे हेच मिशन अयोध्या आहे.