करमाळा (सोलापूर) : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार नारायण पाटील यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणवा व चौकशी करावी; अशी मागणी केली आहे. विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडेही त्यांनी लेखी तक्रार केली असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
‘शेतीच्या वादाचे निवारण करुन निकाल देण्यास होत असलेली दिरंगाई, प्रलंबीत असलेली अनेक प्रकरणे आदींबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने आमदार पाटील यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला. आमदार पाटील यांच्याकडून आमसभेत अधिकाऱ्यांना कामात कुचराई केली तर हक्कभंग प्रस्ताव दाखल केला जाईल’, असे संकेत दिले होते. त्यानुसार हा प्रस्ताव दाखल केला असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.
