करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव श्री येथील नलवडे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी (ग्राम १६३) आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नाने १० लाख निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे बिटरगाव श्री येथील नागरिकांनी आमदार शिंदे यांचा आज (शुक्रवारी) सत्कार केला आहे.
बिटरगाव श्री येथील बिटरगाव श्री ते भोसले वस्ती (नलवडे वस्ती) हा रस्ता अनेक दिवसांपासून रखडलेला होता. हा रस्ता करण्यासाठी नेत्यांकडे पाठपुरावा सुरु होता. त्याला अखेर यश आले आहे. बिटरगाव श्री येथून भोसले व दळवी यांच्या बांधावरून कॅनलवरून हा रस्ता सीना नदीवरील तरटगाव बंधाऱ्याकडे जातो. या रस्त्याने बोराडे, मुरूमकर, नलवडे, पाटील, शिर्के, चुंबळकर, पाटील आदींची वस्ती आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी महत्वाचा आहे. येथून अनेकजण रस्त्याने ये- जा करतात. या रस्त्यावर पावसात चिखल होतो. उन्हाळ्यात शेतकऱ्यांचा ऊस काढण्यासाठीही येथे मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे हा रस्ता होणे आवश्यक होते. हा रस्ता झाल्यानंतर येथील शेतकऱ्यांचा प्रवास सुकर होणार आहे. सत्कारावेळी आमदार शिंदे यांच्या गटाचे समर्थक सुजित बागल, बबनदादा मुरूमकर, ग्रामपंचायत सदस्य चत्रभुज मुरूमकर, संतोष वाघमोडे, गजेंद्र बोराडे, पत्रकार अशोक मुरूमकर आदी उपस्थित होते.