करमाळा (सोलापूर) : आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे करमाळा तालुक्यातील प्रशासकीय संकुलासाठी 34.68 कोटी तर कुर्डूवाडी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासाठी 1.77 कोटी निधी मंजूर झाला आहे. प्रशासकीय संकुलामध्ये करमाळा पंचायत समिती, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, पोलिस स्टेशन ही कार्यालये एकाच ठिकाणी होणार आहेत.
आमदार शिंदे म्हणाले, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये करमाळा तालुक्याच्या हिताच्याबाबी पूर्णत्वास जात आहेत. याचे समाधान आहे .याच अधिवेशनामध्ये कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधी मंजुरीचे निर्देश देण्यात आले. त्याचबरोबर दहिगाव योजनेतील शिल्लक पाण्यात इतर गावे समाविष्ट करण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश या कामांबरोबरच इमारत बांधकामासाठी भरीव निधी मिळाल्यामुळे करमाळा शहराच्या वैभवात भर पडत आहे. अनेक वर्षापासून सर्वच शासकीय कार्यालय एकाच इमारतीत हवेत ही प्रशासकीय संकुलाची मागणी पूर्णत्वास जात आहे. या बजेटमध्ये राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यासाठीही मोठ्या प्रमाणावरती निधी लवकरच उपलब्ध होणार आहे, असेही ते म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी सरकारमध्ये असल्यापासून आमदार शिंदे यांचा प्रशासकीय संकुल बांधकामासाठी पाठपुरावा सुरु होता. महायुतीच्या कार्यकाळात ही मागणी मंजूर झाली आहे. करमाळा शहरातील प्रशासकीय संकुलासाठी 34.68 कोटी तर कुर्डूवाडी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासाठी 1.77 कोटी निधी असा साधारण 37 कोटी निधी मंजूर झाला आहे.