करमाळा (सोलापूर) : दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून दुधाचे अनुदान मिळवण्यासाठी फिडींगच्या कामासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन देण्यात आले. आमदार संजयमामा शिंदे, आमदार यशवंत माने व आमदार देवेंद्र भुयार यावेळी उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, दूध उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आहे. त्यांच्या दुधाला चांगला दर मिळाला पाहिजे. यावर उपाय म्हणून सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्या अनुदानापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून फिडींगच्या कामासाठी मुदतवाढ देण्याची गरज आहे. याबाबत शेतकऱ्यांची मागणीचे महत्व पाहून उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले आहे. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पवार यांनी दिले, असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.