(अशोक मुरूमकर)
माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी धैर्यशील मोहिते पाटील यांना जाहीर झाली आहे. तर महायुतीकडून भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळालेली आहे. या मतदारसंघात प्रमुख लढत निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील अशीच होणार असल्याचे चित्र आहे. उद्या (मंगळवारी) निंबाळकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे.
माढा मतदारसंघात निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यापासून मोहिते पाटील समर्थक नाराज होते. त्यातून त्यांनी बंडखोरी करत शरद पवार गटात प्रवेश करून महाविकास आघाडीची उमेदवारी घेतली आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी त्यांनी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करून सर्वसामान्य मतदारांचा कानोसा घेतला होता. त्यानंतर त्यांनी ‘तुतारी’चा निर्णय जाहीर केला आणि त्याच दिवशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
आतापर्यंत भाजपचे उमेदवार निंबाळकर यांना समोरून कोण उमेदवार असेल याचा अंदाज नव्हता. मोहिते पाटील हे भाजप सोडायचे नाहीत असा एक समज व्यक्त केला जात होता. मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने येथील निवडणुकीत रंगत आली आहे. सध्याच्या क्षणाला जनमानसात ‘तुतारी’ला वातावरण असल्याचे दिसत आहे. मात्र हे वातावरण पुढे कसे राहील यावर मतदारसंघातील समीकरणे असणार आहेत.
या मतदार संघात मोहिते पाटलांमुळे निंबाळकर यांना विजय सोपा राहिलेला नाही. मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावेळी उपस्थित गर्दी आणि त्यानंतरचे वातावरण यावरून हे स्पष्ट होते. याचा परिणाम फक्त माढा मतदारसंघातच नाही तर सोलापूरमध्ये सुद्धा दिसेल असे बोलले जात आहे. बीडचा पार्सल परत पाठवायचे असे म्हणत’ धैर्यशील मोहिते पाटील यांनी सातपुते यांनाही आव्हान दिले आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे व मोहिते पाटील समर्थकांमधील नाराजी यावरून हे स्पष्ट होत आहे.
माढा मतदारसंघात निंबाळकर यांना फक्त मोदींच्या नावावर निवडणूक जिंकणे भाजपला सोपे नाही. येथे निंबाळकर यांच्यावरील नाराजी आहे. ती नाराजी दूर कशी केली जाणार हे पहावे लागणार आहे. मोहिते पाटील यांच्यावर अन्याय झाल्याची भावना जनमानसात आहे. त्यात शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याबाबतही भावनिक वातावरण तयार झाले आहे.