करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघासाठी काल (मंगळवारी) अत्यंत चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीत तरुणांचे मतदान निर्णायक ठरले अशी शक्यता आहे. भाजपला सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामुळे शेवटच्या टप्यात आव्हान ठरली, असे बोलले जात आहे. 4 जूनला निकालात कोणाला कौल मिळाला हे स्पष्ट होणार असले तरी आतापासूनच दोन्ही गटाकडून दावे- प्रतीदावे सुरू झाले आहेत.

या निवडणुकीत भाजपने पहिल्याच यादीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मोहिते पाटील समर्थक नाराज झाले होते. त्यानंतर संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन त्यांची समजूत काढण्यासाठी अकलूजला आले होते. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. दरम्यान भाजप उमेदवारी बदलेल, अशी शक्यता निर्माण झाली होती. दरम्यानच्या काळात धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघात दौरा करून मतदारांचा कौल घेतला तेव्हा त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवण्याची मागणी झाली होती.

निवडणूक प्रचार सुरु झाल्यानंतर निंबाळकर यांनी राम मंदिर, कोरोना काळात मोदींनी लस उपलब्ध करून दिली, फ्लड डायव्हेशन, टेंभुर्णी- जातेगाव महामार्ग, पाणी योजना, मराठा व धनगर आरक्षण यावर भर दिला. त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या. आमदार संजयमामा शिंदे यांनी संपूर्ण तालुक्यात दौरा केला. बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव व आदिनाथ कारखान्याचे प्रशासकीय संचालक विलासराव घुमरे व दिग्विजय बागल यांनी महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत कृतज्ञता मेळावा घेऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले होते. भाजपचे गणेश चिवटे, शिवसेनेचे (शिंदे गट) महेश चिवटे, आरपीआयचे अर्जुन गाडे, शिंदे गटाचे समर्थक सुजित बागल, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) भारत अवताडे आदींनी प्रचार केला.

मोहिते पाटील यांच्यासाठी शरद पवार यांची सभा झाली. करमाळ्यात राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांची सभा झाली होती. माजी आमदार नारायण पाटील, बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, पाटील गटाचे समर्थक, अजित तळेकर, डॉ. अमोल घाडगे, अमरजित साळुंखे यांनी जोरदार प्रचार केला.

मतदानादरम्यान भाजपचे कार्यकर्ते मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. काही ठिकाणी तर स्थानिक मुद्देही मांडण्यात आले. भाजप विरोधी कार्यकर्ते मात्र कांद्याला भाव नाही, दुधाला दर नाही, महागाई वाढली, पेट्रोल- डिझेलचे वाढलेले दर, शेतमालाचा दर कमी असे मुद्दे मांडण्यात आले. हे मुद्दे मांडण्यात तरुण मतदार पुढे होते. बेरोजगारी व मराठा आरक्षण यावर तरुणाई आक्रमकपणे बोलत होती. त्यावरून तरुणाईच्या मनात भाजप सरकारबद्दल रोष असल्याचे जाणवत होते. शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती देखील महत्वाची असून याचा किती परिणाम होणार हे पहावे लागणार असून या निवडणुकीत हे मतदान निर्णायक ठरणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *