करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाजपला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक डोकेदुःखू ठरू लागली आहे. गावागावात ‘तुतारी’ची हवा दिसत आहे. त्यामुळे मोहिते पाटील हे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना डावलत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला असून ‘आपण विजयाच्या अविर्भावात राहू नये; अन्यथा चित्र वेगळे दिसेल’ असे शिवसेना (ठाकरे गट) व काँग्रेसचे पदाधिकारी बोलू लागले आहेत.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची शुक्रवारी (ता. २६) सभा होणार आहे. यावेळी माजी आमदार नारायण पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. याची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र मोहिते पाटील हे महाविकास आघाडीतील उबाठा शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत, असे आरोप केले जाऊ लागले आहेत. पदाधिकाऱ्यांना अजून अधिकृत माहितीही देण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे.
१) काँग्रेसचे सुनील सावंत हे महाविकास आघाडीच्या प्रचारात अजूनही सक्रीय झालेले दिसत नाहीत. सुनील सावंत यांचा करमाळ्यात सावंत गट आहे. या गटाचा करमाळा शहरात राजकारणावर प्रभाव आहे. नगरपालिका निवडणुकीत त्यांची कायम महत्वाची भूमिका असते. त्यांच्याकडे १२ माजी नगरसेवक आहेत. काही सोसायटी त्यांच्याकडे आहेत. तालुक्यातील पाच सरपंच त्यांच्याकडे आहेत. मात्र सभेबाबत त्यांना अधिकृत माहिती देण्यात आली नाही, असे सांगितले जात आहे.
स्थानिक राजकारणात सावंत हे आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक आहेत. मात्र पक्ष आदेश पाळत त्यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचा मेळावा घेतला होता. त्यानंतर महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याचा प्रचार करण्याची त्यांनी भूमिका मांडली होती. अभयसिंह जगताप यांचे नाव चर्चेत असताना त्यांनी म्हसवड येथे शक्तिप्रदर्शनही केले होते. मोहिते पाटील यांचा गावभेट दौरा झाला तेव्हा त्यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेण्याचे आवाहन देखील केले होते. मात्र उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना डावलले आहे का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. पक्ष आदेश पळत आपण काम करत आहोत, मात्र मोहिते पाटील यांना आपली किंमतच नसेल तर काय करायचे असा प्रश्न त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. दरम्यान सावंत यांनी यावर काहीही प्रतिक्रीया दिली नाही.
२) उबाठा शिवसेनेचा काही दिवसांपूर्वी कार्यकर्ता मेळावा झाला होता. तेव्हा मोहिते पाटील यांचे काही पदाधिकारी उपस्थित होते. मात्र त्यांनी त्यानंतर युवा सेना, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शाहू फरतडे यांच्याशी संपर्क साधलेला नाही. शुक्रवारी होणाऱ्या सभेसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते आणायचे आहेत की नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर असल्याचे बोलले जात आहे. फरतडे यांचे मंचावर उपस्थितीबाबत नाव आहे, मात्र त्यांना अजूनही याची कल्पना नसल्याचे समजत आहे. केम शहर शिवसेना प्रमुख सतीश खानट म्हणाले, करमाळा शहर व तालुक्यात आम्ही उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने कायम काम करत आलो आहोत. आम्ही अनेक चढ- उतार पाहिले आहेत. आम्ही कायम प्रामाणिक काम करत आलो आहोत, मात्र आम्हाला डावलले जात असले तर काम कसे करायचे. आमचेही कार्यकर्ते आहेत. उपस्थितीतबाबत किंवा निवडणुकीच्या पाटील यांच्याकडून कोणतीच माहिती दिली जात नसेल तर आम्ही वरिष्ठांशी बोलून योग्य तो निर्णय घेऊ.
३) राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष संतोष वारे म्हणाले, राष्ट्रवादीतील गटबाजी व नाराजी आम्ही दूर केली आहे. सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जात आहे. मात्र महाविकास आघाडीतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचीही नाराजी राहू नये यासाठी प्रयत्न केला जाईल. सर्वांचा समनव्य ठेऊन मोहिते पाटिल यांना विजयी करण्यासाठी काम करत आहोत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल. मात्र कोणाचीही नाराजी राहणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल.