करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरण बोट दुर्घटना प्रकरणात तिसऱ्यादिवशी बेपत्ता झालेल्या सहाजणांचे आज (गुरुवारी) मृतदेह सापडले. या मृतदेहाचे शवविच्छेदन करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. कुगाव येथून चार रुग्णवाहिकेने हे मृतदेह करमाळा येथे आणण्यात आले. हे मृतदेह आले तेव्हा हृदय हेलवणारे चित्र होते. मृतदेहाची अवहेलना होऊ नये आणि कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली होती. तत्काळ प्रक्रिया करून सर्व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
उजनी जलाशयात मंगळवारी (ता. २१) सायंकाळी कुगाव (ता. करमाळा) येथून कळशीकडे (ता. इंदापूर) जाणारी प्रवासी बोट वादळी वाऱ्याने उलटली होती. या बोटीत चालकासह सातजण होते. त्यातील एकजण पोहत बाहेर आला होता. बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे मृतदेह सापडल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करत शवविच्छेदन करण्यासाठी हे मृतदेह एकामागे एक असे करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे आणले होते.
करमाळा तालुका दुःखात! शोकाकुल वातावरणात झरेत माय-लेक व बाप- लेकावर तर कुगावामध्ये दोघांवर अंत्यसंस्कार
यामध्ये वडील गोकुळ जाधव व चिमुकला शुभम गोकुळ जाधव (वय दिड वर्ष) याचा एका रुग्णवाहिकेत तर आई कोमल गोकुळ जाधव (वय २५) व चिमुकली माही गोकुळ जाधव (वय ३, सर्व रा. झरे, ता करमाळा) यांचे मृतदेह दुसऱ्या रुग्णवाहिकेत आणले होते. अनुराग ज्ञानदेव अवघडे (वय २८ बोट चालक, रा. कुगाव) यांचा मृतदेह एका रुग्णवाहिकेत होता तर आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचे चिरंजीव गौरव धनंजय डोंगरे (वय २४, दोघे रा. कुगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांचा मृतदेह चौथ्या रुग्णवाहिकेत आणला.
मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी हे मृतदेह आणले होते. रुग्णवाहिकेतून शवविच्छेदन भागात मृतदेह नेहताना हृदयहेलवणारे दृश्य होते. कोणतीही अवहेलना होणार नाही याची दक्षता उपस्थित कर्मचारी व अधिकारी घेत होते. चिमुकल्याला जस अलगद खांद्यावर घेतले जाते तसा त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेच्या चालकाने घेतला होता. झोळीत हे मृतदेह होते. त्यांना उचलल्यानंतर पहाणारांचे डोळे पाणावले. ज्यांनी अजून जगही नीट पाहिले नाही त्यांच्यावर काळाने घाला घातल्याची भावना यावेळी व्यक्त केली जात होती.
ज्या आई- बापाने बोट उलटताना चिमुकल्यांसाठी मृत्यूशी झुंज देत स्वतःचा जीव गमावला याची साधी त्यांना कल्पनाही नसेल. गुण्या गोविंदाने संसार करणारे हे झरेतील हे जाधव कुटुंब आज जगात नाही. एका धार्मिक कार्यक्रमासाठी घरातून मोटरसायकलने हे कुटुंब चिमुकल्यांसह कुगाव येथे उजनीच्या कटावरून बोटीने कळाशीला निघाले होते. तेथे जाण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. आणि त्यांचा हा प्रवास अर्ध्यावर राहिला. फक्त कळशीपर्यंतचाच नव्हे तर संपूर्ण आयुष्याचा प्रवास त्यांचा संपला आहे. झरे येथे एकाच सरणावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.