करमाळा (सोलापूर) : कमलाभवानी बहुउद्देशीय संस्था संचलित सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने रविवारी (ता. 20) सायंकाळी 5 वाजता विकी मंगल कार्यालय येथे संगीत आणि नृत्य महोत्सव होणार आहे. दरवर्षीप्रमाणे पं. विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पं. के. एन. बोळंगे गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त हा उत्सव होणार आहे.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्याबरोबर वेगवेगळ्या राज्यातील तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक व नृत्य कलावंत उपस्थित राहणार आहेत. शास्त्रीय गायिका परामिता राॅय कोलकत्ता, मणिपुरी नृत्यांगणा नंदीतो कुहेलीका कोलकत्ता, कत्थक नृत्यांगना मौमिता चक्रवर्ती सिलिगुडी, ओडिसी नृत्यांगना सुजाता नायक कोलकाता, सत्रिय नृत्यांगना मंजूमनी बोराह गुवाहाटी, कुचीपुडी नृत्यांगना तेजस्विनी कलगा हैदराबाद, भरतनाट्यम नृत्यांगना सुदीपा सैन सिल कोलकत्ता, कथक नृत्यांगना डॉ. अर्पिता चॅटर्जी कोलकत्ता इत्यादी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना तसेच कलाकारांना संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच करमाळा येथील रसिकांना वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य पाहायला मिळणार आहेत. तरी रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा, असे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी आव्हान केले आहे.