सोलापूर : महिला व बालविकास विभाग अंतर्गत, महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत 7 ते 9 दरम्यान तीन दिवसाकरिता जिल्हास्तरावर दिवाळी मेळाव्याचे ड्रीम पॅलेस पोलिस कल्याण केंद्र, मुरारजी पेठ सोलापूर येथे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले.
या उद्घाटन प्रसंगी बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक चंद्रशेखर मंत्री, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे आदी उपस्थित होते. या उद्घाटनप्रसंगी बोलताना पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळचे काम हे कौतुकास्पद असून स्वयंमसहायता महिला बचत गटांना प्रेरणा देणारे आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिला बचत गटातील महिला ह्या आज स्वतः उत्पादन करतात व त्याची विक्री तालुका, जिल्हा व देश पातळीवर करत असून उत्पादने करणारे महिला ह्या त्यांच्या कुटुंबाचे आधारस्तंभच आहेत. ज्यामुळे त्या कुटुंबाची रोजची उपजीविका भागते, असे त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी महिला बचत गटाच्या स्टॉल ला भेट देऊन महिला उत्पादकांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी केले. यावेळी त्यांनी येथील सर्व स्टॉलला भेट दिली व महिला बचत गटाच्या सदस्यांशी चर्चा केली. या विक्री प्रदर्शनामध्ये ग्रामीण भागातील ताजे व स्वच्छ दिपावलीचे पदार्थ, पणत्या, आकाश कंदील, विणकाम, लाकडी कोरीव काम केलेल्या विविध वस्तु, कापडी शिवणकाम केलेल्या वस्तु, सुगंधी अत्तर व अगरबत्ती यासह अनेक वस्तु प्रदर्शनात योग्य भावात उपलब्ध असून, प्रदर्शन दर दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 9 पर्यंत असेल.
ग्रामीण महिलाच्या छोट्या-मोठ्या व्यावसायाकडील वाटचालीस प्रोत्साहन देण्याकरिता जास्तीत जास्त नागरिकानी भेट देवून खरेदीचा आनंद घ्यावा. जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे यांनी प्रास्ताविक केले व माविमच्या कामकाजाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद चिंचोरे यांनी केले तर आभार सतीश भारती शहा यांनी आभार मानले. प्रदर्शन यशस्वितेसाठी सर्व माविम व तालुका स्तरीय कर्मचारी परिश्रम घेत आहेत.