सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या निर्देशाप्रमाणे वर्षातील तिसरे राष्ट्रीय लोकअदालत शनिवारी 13 सप्टेंबरला सोलापूर जिल्हयातील सर्व न्यायालयात होणार आहे. यामध्ये फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, कलम 138 एनआय अॅक्टची प्रकरणे, अपघात न्यायाधिकरणाबाबतची प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, वीज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे, वैवाहिक वादाबाबतची प्रकरणे, भुसंपादन बाबतची प्रकरणे तसेच बँक, सहकारी बँक, सहकारी पतसंस्था यांच्या वसुलीच्या दरखास्त, बँक लवाद दरखास्त इत्यादी (प्रलंबित व दाखलपूर्व) प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.
या लोकअदालतीमध्ये सोलापूर महापालिकाच्या कर आकारणी व गाळेधारक यांची प्रकरणे तसेच ग्रामपंचायतीमधील घरपट्टी व पाणीपट्टी यांच्या थकीत बिलाची दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहे. पक्षकारांना लोकअदालतमध्ये प्रत्यक्षरीत्या सहभागी होता येणार नाही. त्यांच्यासाठी आभासी पध्दतीने उपस्थित राहणेकरीता ऑनलाइन माध्यमाचा वापर केला जाणार आहे.
सदरच्या लोकन्यायालयात ई चलनाच्या प्रकरणात एसएमएसद्वारा वाहनधारकांच्या मोबाईलवर नोटीसा पाठविले जात आहेत. सदर चलनानुसार नोटीसमध्ये नमूद लिंकवर ऑनलाइनव्दारे चलनाची रक्कम भरता येवू शकते. तसेच महा ट्राफिक या अॅपवरसुध्दा सदर रक्कम भरता येवू शकते. या व्यतिरीक्त महाराष्ट्रातील कोणत्याही जवळच्या वाहतूक शाखेमध्ये जावून रक्कम भरता येवू शकते.
धनादेश न वटलेल्या फौजदारी प्रलंबित प्रकरणांमध्ये धनादेशाची थोडी रक्कम भरुन प्रकरण निकाली काढता येणे शक्य होणार आहे. धनादेशाची रक्कम एक रकमी देता येणे शक्य नसल्यास ठरलेल्या रक्कमेचे हप्ते बांधून घेणे शक्य होणार आहे. काही रक्कम लोकअदालती दिवशी देवून उर्वरीत रक्कमेबाबत तडजोड हुकुमनामा करणे व संपुर्ण फौजदारी प्रकरण निकाली निघणे शक्य होणार आहे. परिणामी पक्षकारास न्यायालयात पुन्हा हजर राहण्याची आवश्यकता राहणार नाही. सदर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी आपापली प्रकरणे तडजोडीने मिटवुन लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष मनोज एस. शर्मा सोलापूर यांनी केले आहे.