करमाळ्यात राष्ट्रवादीचे १३ उमेदवार रिंगणात, भूमिकेकडे लक्ष

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) १३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार महायुती धर्मपाळत या निवडणुकीत उरण्याचा निर्णय असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भारत अवताडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काय खेळी खेळली जाते का हे याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

करमाळा नगरपालिकेची एक नगराध्यक्ष व २० नगरसेवक निवडण्यासाठी १० प्रभागातून निवडणूक होत आहे. माजी आमदार शिंदे यांनी सुरवातीलाच या निवडणुकीत महायुती म्हणून उतरण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ चिन्ह घेऊन बानू जमादार, अशपाक जमादार, स्वाती फंड, महादेव फंड, तेजल मोरे, ऋषिकेश शिगजी, गणेश माने, सुवर्णा जाधव, प्रशांत जाधव, धनश्री दळवी व सुहास ओहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वात स्वतंत्र उतरण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांची यामध्ये महत्वाची भूमिका आहे. दुसरीकडे भाजपने सुनीता देवी यांना नगराध्यक्षपदी उमेदवारी दिली आहे. त्यांचे पती कन्हैयालाल देवी हे शिंदे समर्थक आहेत. काहीदिवसांपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपने त्यांना उमेदवारी दिली असून या निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार दिले असल्याने भाजप व राष्ट्रवादी एकत्र राहतील का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नेमका काय निर्णय घेईल हे पहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *