पुणे : सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, क्रीडा नगरी व पेन्शनरांचे ‘शांत- संयमी शहर’ अशी ओळख अंगीकारलेले ‘पुणे’ हे शैक्षणीक केंद्र (एज्युकेशनल हब) बनले आहे. शहरात बाहेरील विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने विविध प्रकारे रोजगारातही वाढ होत आहे. ‘विद्यार्थी सेवा ही देशाच्या भवितव्याची सेवा’ म्हणून पाहिले पाहिजे. पुणे शहराची मुळ शैक्षणिक व ऐतिहासिक ओळख जोपासत, शहराचा बकालपणा न वाढता शिक्षण पुरक व पर्यावरण पोषक वातावरणात शहराचा विकास होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
नारायण पेठेतील ‘प्रवास यशाचा अभ्यासिके’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी अभ्यासिका केंद्र संचालक देवा आवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी धनंजय भिलारे, ॲड. स्वप्नील जगताप, गणेश शिंदे, राजेश सुतार, ऊदय लेले उपस्थित होते. तिवारी म्हणाले, ‘शहरातील अभ्यासिकांची संख्या वाढणे हे पुणे ‘विद्येचे माहेर घर’ असल्याचे द्योतक आहे. मात्र ‘शैक्षणिक वातावरणास पोषक, संतुलित व पर्यावरणपूरक विकास पुणे शहरा करीता अत्यावश्यक आहे.’