करमाळा : ‘कितीही आदळआपट केली तरी विरोधकांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. आमदार नारायण पाटील यांना एकटे पाडण्याचा डाव मतदारच हाणुन पाडतील,’ असा विश्वास पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर म्हणाले, ‘लवकरच आमदार पाटील यांचा गावभेट व कोपरा सभा दौरा सुरू होईल. प्रत्येक गणात काही मोठ्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. आमदार पाटील हे कायम जनमाणसात वावरत असतात. विरोधक निवडणुकी पुरतीच गावोगाव भटकंती करत आहेत. या मंडळींना राजकीय पदे केवळ मिरवायला व लग्न समारंभातील सत्कार स्विकारण्यासाठी हवीत’, असा टोला त्यांनी लगावला आहे.
‘आमदार पाटील यांच्यासाठी सत्ता हे जनसामान्यांच्या विकासाचे साधन आहे व राजकीय पद ही जनसेवेसाठी जनतेने विश्वासाने टाकलेली जबाबदारी आहे. त्यांचा जनसंपर्क कायमच अविरतपणे सुरू राहीला आहे. सुख दुःखात सहभागी होऊन कठीण प्रसंगी नागरिकांना व शेतकऱ्यांना त्यांनी धीर देण्याची भुमिका बजावली आहे. त्यामुळे पाटील गटास निवडणुकीत यश मिळेल,’ असे तळेकर यांनी म्हटले आहे.
