करमाळा (सोलापूर) : पाच वर्षातील गैरकारभाराची पोलखोल करणारा ‘पेनड्राईव्ह’ काढण्याचा इशारा पाटील गटाने शिंदे गटाला दिला आहे. आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा इशारा चर्चेत आला असून याला शिंदे गट कसे उत्तर देणार हे पहावे लागणार आहे.
पाटील गटाचे सुनील तळेकर यांनी याबाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. या ‘पेनड्राईव्ह’ वरुन करमाळा तालुक्यात एका चर्चेला तोंड फुटणार आहे. तळेकर म्हणाले, ‘माजी आमदार संजयमामा शिंदे हे त्यांच्या कालावधीत खर्ची केलेल्या आमदार फंडातील तसेच इतर मंजुर कामांची उद्घाटने, भुमिपुजन करत आहेत. त्यांच्या कालावधीत त्यांनी मंजूर कामांची व इतर कामांची साधी प्रशासकीय मंजूरीसुध्दा वेळेवर मिळवली नाही. हे अपयश स्वतःहून जगाला दाखवत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्यानेच त्यांनी स्टंटबाजी सुरु केली आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, ‘आमदार नारायण पाटील यांनी घेतलेल्या आमसभेत अनेक नागरिकांनी पाच वर्षे रखडलेले प्रश्न मांडले. काहींनी मागील रेकॉर्ड केलेले कॉलही ऐकवले. तर अनेक नागरिकांनी आपणास पाच वर्षात काम करुन घेताना चिरीमिरी मागितल्याचे सांगितले आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. पाच वर्षाच्या काळातील कारभाराची पोलखोल करणारा ‘पेन ड्राईव्ह’च पाटील गटाच्या हाती लागला आहे. या कॉलची सत्यता पडताळून पाहिली जाणार आहे व नंतरच याबाबत पुढील पाऊल उचलले जाणार’ असल्याचे तळेकर यांनी सांगितले.
