करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्य सरकराच्या आदेशानुसार मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षणाचे दाखले देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या दाखल्यासाठी करमाळा येथे आज (मंगळवार) २६ लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले असल्याचे समजत आहे. कुणबी नोंदीच्याआधारे मराठा समाजाला ओबीसीतून (सगेसोयरेचा अध्यादेश) आरक्षण मिळावे अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. त्यासाठी आंदोलनही सुरु आहे. तर दुसरीकडे सरकारने स्वतंत्र आरक्षण जाहीर केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनीयम, २०२४ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहे. त्यानुसार दाखले देण्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. करमाळा येथील निंबाळकर सेतूचे संचालक मदन निंबाळकर म्हणाले, सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आज लाभार्थ्यांनी केलेल्या मागणीनुसार अर्ज ऑनलाईन केले आहेत.
राज्य विधिमंडळाने २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरिता १० टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. शैक्षणिक व नोकऱ्यांसाठी हे आरक्षण असणार आहे. या दाखल्यांसाठी लाभार्थ्यांकडे १९६७ चा मराठा असल्याचा पुरावा, आधारकार्ड, वडिलांचा, मुलाचा शाळेचा दाखल आवश्यक आहे. इतर जातीच्या दाखल्यांप्रमाणेच कागदपत्रे लागत आहेत.