करमाळा (सोलापूर) : येथील श्रीदेवीच्या माळावरील पुरातन ऐतिहासिक श्री कमलाभवानी मंदिराचे सरकारच्या पुरातत्व विभागामार्फत जतन व संवर्धन करावे, अशी मागणी मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी केली आहे. यावेळी अंगद बिडवे, समाधान सोरटे, श्रीराम फलफले, अभिमान पवार, प्रमोद गायकवाड, राजेंद्र पवार, दिलीप चव्हाण, नवनाथ सोरटे, महेश सोरटे, अनिल पवार, पप्पू हिरगुडे, दीपक थोरबोले आदींसह ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/03/Aljapur-Shala-1-1024x591.jpg)
येवले म्हणाले, राजे जानोजी उपाख्य रावरंभा निंबाळकर यांनी १७२७ च्या सुमारास बांधलेले हे मंदिर तुळजाभवानीचे प्रतिरूप मानले जाते. पन्नास एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या या मंदिराच्या बांधकामामध्ये हेमाडपंथी,दाक्षिणात्य आणि मोघल बांधकामशैलीचा वापर केलेला आहे. एवढे भव्यदिव्य, विस्तीर्ण आणि विविध बांधकाम शैलीने नटलेले असे सुंदर मंदिर अन्यत्र कुठेही आढळत नाही. सध्या लोकसहभागातून मंदिर संवर्धनाचे काम हाती घेण्यात आलेले असून यापूर्वीही कमलाभवानीच्या स्वयंभू मूर्तीचा दोनतीन वेळा वज्रलेप तसेच मंदिर जीर्णोद्धार लोकसहभागातून करण्यात आलेला आहे.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/03/Kemkar-I-Cair-1024x738.jpg)
परंतु हे प्रयत्न तसे तोकडे पडत असल्याने या मंदिर व परिसराचे पिढ्यानपिढ्या जतन होणे गरजेचे असल्याने हे मंदिर पंढरपूर, तुळजापूर येथील मंदिरांप्रमाणे सरकारने ताब्यात घ्यावे व या पुढे कायमस्वरूपी या मंदिराचे जतन- संवर्धन व देखभाल पुरातत्व विभागामार्फत करण्यात यावे, अशी मागणी भाविक व देवीचा माळ, करमाळा येथील नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधी व न्याय विभाग,पुरातत्व विभाग, आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी येवले यांनी दिली आहे.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/03/Dhale-3-1024x613.jpg)