करमाळा (सोलापूर) : ‘तू दादागिरी करतो काय’ असे विचारल्यानंतर एकाने शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचा प्रकार दिवेगव्हाण येथे घडला आहे. याबाबत करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नागेश उत्तम मोरे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. ज्ञानेश्वर कालिदास खाटमोडे यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी (ता. ९) हा गुन्हा दाखल झाला आहे.
मोरे हा गुरुवारी खाटमोडे यांच्या घरी आला. तेव्हा मोरेने खाटमोडे यांना ‘तुझा भाऊ तुकाराम घरी आहे का? तू लग्नाला येणार आहे का?’ असे विचारले. त्यावर फिर्यादी खाटमोडे यांनी ‘भाऊ बाहेर गेला आहे. मी लग्नाला येणार’ असल्याचे सांगितले. तेव्हा गुन्हा दाखल झालेला मोरे खाटमोडे यांना म्हणाला की, ‘काल मी तुझ्या मोटारसायकलला घासले होते, आजही घासणार आहे.’ असे म्हणत गुन्हा दाखल झालेल्या मोरेने फिर्यादी खाटमोडे यांच्या मोटरसायकलजवळ त्याची मोटरसायकल आणली. तेव्हा फिर्यादी खाटमोडे मोरेला म्हणाले कालही तू माझ्या गाडीला घासले आजही घासतो आहे. तू दादागिरी करत आहे का?’ असे विचारल्यानंतर त्याने मारहाण केली. यात खाटमोडे यांच्या कपाळाला लागले आहे. यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.