करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा- नगर महामार्गावर मांगी स्टँडवर एसटी बस व दुचाकीचा अपघात झाला आहे. यामध्ये दुचाकीवरील तिघे ऊसतोड कामगार जखमी झाले आहेत. जखमी महिलेला सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्चार रुग्णालयात दाखल केले आहे. तर एका चिमुकल्याला करमाळ्यात खासगी रुग्णालयात व एकावर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी हे वडगाव उत्तर येथील आहेत.
मांगीजवळ आज (शनिवारी) सकाळी हा अपघात झाला आहे. सोलापूर येथून नाशिकला एसटी बस जात होती. तर अपघातातील जखमी हे दुचाकीवरून पोथरेकडे ऊसतोडणीसाठी जात होते. सोनाली पांडुरंग शिंदे (वय ३२), पांडुरंग बबन शिंदे (वय ३२) व गजानन पांडुरंग शिंदे (वय १२) अशी यातील जखमींची नावे आहेत. या रस्त्यावर कालच (शुक्रवारी) छोरीया टाऊनशिप समोर ट्रकचा अपघात झाला होता. त्यानंतर आज हा अपघात झाला आहे.
अपघातग्रस्तांना मदत मिळावी म्हणून सावंत गटाचे सुनील सावंत व मनसेचे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे हे उपजिल्हा रुग्णालय येथे उपस्थित होते. तेथे रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांनी रुग्णांना सेवा देण्यासह टाळाटाळ केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. डॉक्टरांनी योग्य सेवा दिली नाही, रुग्णाला उपचारासाठी नेहण्यासाठी स्टेर्चर नव्हते, असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर यांच्याकडे तक्रार येताच त्यांनी स्वतः रुग्णांची विचारपूस केली. रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने सेवा देण्यास अडचण येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. येथे सुविधा आहेत, मात्र डॉक्टर व कर्मचारी नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.