करमाळा (सोलापूर) : आयुष्यात कोणतीही गोष्ट सहज मिळत नसते. ती मिळवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द हवी. स्वतःची गुणवत्ता ओळखून अभ्यास करा आणि त्याच क्षेत्रात यश मिळावा, असा सल्ला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या डॉ. शुभांगी पोटे- केकान यांनी करमाळा येथे दिला आहे.
यशकल्याणी सेवाभावन येथे डॉ. पोटे- केकान यांचा सत्कार झाला. तेव्हा त्यांनी त्यांच्या यशाचा प्रवास सांगत पालक आणि उपस्थित विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. माझ्या यशात आई- वडिलांसह कुटुंबातील सर्वांचा वाटा आहे. आपल्या मुलांनी व्यवसायात किंवा कोणत्यातही क्षेत्रात यश मिळवावे असे वाटत असेल तर त्याला पाठबळ द्या. आपली धडपड पाहूनच आपल्याला मदत केली जाते. त्यामुळे कष्ट आणि संघर्ष करण्याची आपल्यात तयारी हवी. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना टार्गेट ठेऊनच अभ्यास करा, असेही त्या म्हणाल्या आहेत.
यावेळी प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ऍड. बाबुराव हिरडे, प्रा. प्रदीप मोहिते, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील, माजी सैनिक संघटनेचे श्री. शिंदे, शिक्षणाधिकारी श्री. बदे आदी उपस्थित होते.