करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील सर्वात महत्वाचा समजला जाणाऱ्या सुभाष चौकाचे नामांतर करण्यास विरोध होऊ लागला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या चौकाचे नाव न बदलता राशीन पेठचे नाव सीताराम पेठ किंवा श्रीराम पेठ असे करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विनापरवाना चौकाचे नामांतर करून कोणी फलक लावला तर कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
सोमवारी आयोध्या येथे श्रीराम मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करमाळ्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यातच सुभाष चौकाचे नामांतर करून श्रीराम चौक करण्यात यावे अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र सुभाष चौकाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सांगत हे नाव न बदलण्याची मागणी समविचारी नागरिकांनी एकत्र येऊन केली आहे. याबाबत आज (गुरुवारी) तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदनही दिले आहे.
ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष संतोष वारे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ॅअड. शिवराज जगताप, रामकृष्ण माने, प्रा. गोवर्धन चवरे, निलावती कांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान येवले म्हणाले, ‘आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वातंत्र्यप्रेमाने भारावलेल्या युवापिढीने या चौकाला सर्वानुमते सुभाष हे नाव दिले होते. या चौकाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या चौकाचे नामंतर न करता येथील राशीन पेठचे नामंतर करावे. राशीन पेठला सीताराम किंवा श्रीराम पेठ असे नाव देता येऊ शकेल. श्रीराम हे आमचेही श्रद्धास्थान आहे. त्यांच्या नावाला आमचा विरोध नाही, मात्र सुभाष चौकाचे नामंतर करण्यास समविचारी नागरिकांचा विरोध आहे. परवानगीशिवाय कोणीही चौकाचे नाव बदलण्याचा प्रयत्न करू नये, असेही ते म्हणाले आहेत.
यावेळी भीमदल संघटनेचे सुनील भोसले यांनीही निवेदन देऊन सुभाष चौकाच्या नामांतरणाला विरोध केला असून नामांतर केलेच तर या चौकाला श्रीराम चौक असे नामांतर न करता शिव शाहू फुले आंबेडकर चौक असे नामांतर करण्याची मागणी केली आहे.