करमाळा (सोलापूर) : महायुतीच्या माध्यमातून काँग्रेसमधून आयात केलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षादेश मानून आम्ही करमाळा तालुक्यातून भरभरून मताधिक्य दिलेले होते. मात्र त्यांनी दुटप्पी भूमिका घेतली असल्याचा आरोप करत निंबाळकर यांना भाजपाने उमेदवारी देवू नये, अशी मागणी युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
गायकवाड म्हणाले, शिवसेनाच्या आदेशानुसार निंबाळकर यांच्यासाठी संपूर्ण मतदार संघात मतदारांना एकत्र करीत त्यांना मतदान करण्याचे प्रामाणिकपणे काम केले होते. परंतु निंबाळकर यांना मात्र ज्यांनी मदत केली आहे ज्यांनी रात्रंदिवस त्यांचा प्रचार केला आहे त्यांचा विसर पडला असून जे विरोधात काम करीत होते त्यांच्याशी ते जवळीक साधत आहेत. महायुतीच्या माध्यमातून ते नागरिकांच्या प्रश्नांची उकल करतील त्यांना न्याय देतील परंतु ज्यांनी काम केले त्यांच्यावर अन्याय करून जे त्यांच्या विरोधात उभे होते, असे करमाळयाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना ते न्याय देत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेच्या जनाधार नसलेल्या एका व्यक्तीला हाताशी धरून त्यांच्यासोबत फोटो काढून अथवा त्यांच्या वाढदिवसाला उपस्थिती लावून संपूर्ण पक्ष तुमच्या मागे असेल असा गैरसमज निंबाळकर यांनी काढून टाकावा. एक व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही, असे म्हणत त्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांचे नाव न घेता टिकास्त्र सोडले आहे. पाच वर्षात निंबाळकर यांनी एकदाही मित्र पक्ष म्हणून शिवसेनेची बैठक घेतली नाही अथवा त्यांच्या शासन स्तरावर काय अडचणी आहेत याचा मागोवा घेतलेला नाही. महायुतीचा खासदार शिवसैनिकांच्या मदतीला उपयोगी येत नसेल तर भाजपाने आता विचार करून नवीन उमेदवार देणे गरजेचे असल्याचे मत गायकवाड यांनी व्यक्त केले.