करमाळा (सोलापूर) : दिवाळी म्हणजेच दिव्यांचा सण कार्तिक महिन्यातील अमावस्येला हा सण येतो. अमावस्येचा अंधकार दूर करण्यासाठी आपण सर्वत्र पणत्या लावतो, दिवे लावून आपले घर सुशोभित करतो. फक्त घर सुशोभित करणे हाच एक दिवे लावण्या मागचा उद्देश नसून आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी तसेच घरात सकारात्मकता यावी या उद्देशाने आपण सर्वत्र पणत्या लावत असतो.
विद्यार्थ्यांना पणत्या प्रज्वलित करण्याचे महत्त्व समजावे तसेच पणत्यांच्या खरेदी विक्रीतून नफा तोटा समजावा या उद्देशाने गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये ‘पणती महोत्सव’ राबवण्यात आला. या उपक्रमात स्कूलमधील पहिलीपासून नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यातील 650 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आकर्षक हॅन्डमेड आकाश कंदील, पणत्या तयार करून त्यांचे प्रदर्शन भरवले तर 300 हुन अधिक विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने पणत्या रंगवून, सुंदर डेकोरेट करून त्यांची विक्री केली.
पालकांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावत विद्यार्थ्यांकडून पणत्या खरेदी केल्या व कार्यक्रमाची शोभा वाढवली. पणत्या विक्री करतानाचा विद्यार्थ्यांचा उत्साह कौतुकास्पद होता. अशाप्रकारे संस्थेचे संस्थापक नितीन भोगे व संस्थापिका माननीय सौ. भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला.